हप्ते गोळा करण्यासाठी टोळ्या निर्माण केल्या - संभाजी निलंगेकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

लातूर - गेल्या 35 वर्षांत व्यापारी व अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हप्ते गोळा करण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी विविध संघटना व टोळ्या निर्माण केल्या, अशी टीका पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बुधवारी (ता. पाच) रात्री केली.

लातूर - गेल्या 35 वर्षांत व्यापारी व अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हप्ते गोळा करण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी विविध संघटना व टोळ्या निर्माण केल्या, अशी टीका पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बुधवारी (ता. पाच) रात्री केली.

येथील व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी व्यापारी महासंघाचे प्रदीप सोळुंकी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
व्यासपीठावर शहराध्यक्ष शैलेश लाहोटी, नीलेश ठक्कर, सुरेश पवार, मोहन माने आदी उपस्थित होते. "गेल्यावर्षी दुष्काळ होता. नळाला पाणी आले नाही. तरीदेखील महापालिकेकडून पाणीपट्टी वसूल केली जात आहे. महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता द्या, पाणीपट्टी माफ केली जाईल, अशी ग्वाही श्री. निलंगेकर यांनी या वेळी दिली.

महापालिकेकडे कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, अनेक कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत नाहीत; पण कॉंग्रेसच्या नेत्यांच्या गाडीचा चालक, नोकर मात्र कायम आहे. गेल्या 35 वर्षांत यांनी हप्ते वसुलीसाठी संघटना, टोळ्या उभ्या केल्या. व्यापारी, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून यांचीच माणसे हप्ते वसूल करायचे. आता आपले सरकार आहे. व्यापाऱ्यांना साधा धक्काही लागणार नाही याची काळजी आपण घेऊ, असेही श्री. निलंगेकर म्हणाले.

चर्चा करायला "संभाजी' नाव लागते
लातूरच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हिंमत असेल तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर यावे. चर्चा करायला "संभाजी' नाव लागते. गेल्या 35 वर्षांत कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकले. हे आरक्षण मुक्त करू, अशी ग्वाही श्री. निलंगेकर यांनी या वेळी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते विकासासाठी नऊ हजार कोटी रुपये दिले आहेत. येत्या दहा तारखेला त्यांच्या हस्ते हायवेचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती श्री. निलंगेकर यांनी या वेळी दिली.

Web Title: gang generation for installment collection