वाहत्या नाल्यात टाकतात कचरा

Global-Environment-Day
Global-Environment-Day

औरंगाबाद - कोणतीही महापालिका शहराच्या स्वच्छतेकडे प्रथम लक्ष देते; पण औरंगाबाद महापालिका ही जगातील एकमेव असेल, जिथे शहरातील कचरा जिथल्या तिथे सडवला जातो. पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला टिळकनगरच्या भरवस्तीतील नाल्यात सोमवारी (ता. चार) दुपारी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचऱ्याने भरलेली गाडीच रिकामी केल्याचे नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपून ‘सकाळ’कडे आणून दिले.

सहा महिन्यांपासून महापालिकेला कचऱ्याचा प्रश्‍न सोडवता आलेला नाही. नारेगावच्या नागरिकांच्या पाया पडून मुदती मागितल्या खऱ्या; पण त्या मुदतीत कबूल केलेले काम महापालिकेने पूर्ण केले नाही. सत्ताधारी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना शहरात येऊन माफी मागावी लागली. त्यांनीही दहा दिवसांत कचरा हटवण्याचे आदेश दिले, तरी स्थानिक नेत्यांना त्याचे गांभीर्य कळाले नाही. नगरसेवकांचे दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांची मुजोरी यामुळे शहरातील कचरा जागोजाग तसाच पडून आहे. औरंगपुरा, सिद्धार्थ उद्यान, जुना बाजारसह अनेक ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यांना वारंवार आगी लावल्या जात असल्यामुळे प्रदूषणाबरोबरच नागरिकांमध्ये आजारांचे प्रमाणही वाढले आहे. आता तर थेट नाल्यांमध्येच कचरा टाकणे सुरू झाल्यामुळे पावसाळ्यात शहरवासीयांवर कोणते संकट ओढवणार आहे, याची कल्पनाही न केलेली बरी...! 

सोमवारी दुपारी कोर्टातून घरी आलो, तेव्हा महापालिकेची गाडी टिळकनगरच्या नाल्यात कचरा ओतताना दिसली. तिथे दोन कर्मचारी आणि त्यांच्यावरील मुकादमही हजर होता. पावसाळ्यात नालेसफाईची कामे केली जातात, असे ऐकले होते; पण पावसाळ्याच्या तोंडावर वाहत्या नाल्यांमध्ये कचऱ्याच्या गाड्या रिचवणारी औरंगाबादची एकमेव महापालिका असेल.
- ॲड. श्रीराम देशमुख

पावसाळ्यात पसरणार रोगराई
शहरातील बारूदगर नाला, औरंगपुरा, प्रतापनगर, समर्थनगर, टाऊन हॉल, बायजीपुरा, कैलासनगर, फाजलपुरा, एकनाथनगर अशा सर्वच ठिकाणी नाले कचऱ्याने तुंबले आहेत. परवाच्या पावसाचे पाणी या नाल्यांमधून ओसंडून वाहिल्याने कचरा रस्त्यांवर आला. जिल्हा परिषदेचे मैदान कचऱ्याने भरले आहे. जागोजाग साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे ऐन पावसाळ्यात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com