हर्सूलमध्ये कचऱ्याला पुन्हा विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

औरंगाबाद - सध्या पडून असलेल्या कचऱ्याची आधी विल्हेवाट लावा, त्यानंतरच हर्सूलमध्ये कचरा टाकण्यास परवानगी देऊ, असा पवित्रा घेत नागरिकांनी बुधवारी (ता. ३०) पुन्हा एकदा महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या परत पाठविल्या. 

औरंगाबाद - सध्या पडून असलेल्या कचऱ्याची आधी विल्हेवाट लावा, त्यानंतरच हर्सूलमध्ये कचरा टाकण्यास परवानगी देऊ, असा पवित्रा घेत नागरिकांनी बुधवारी (ता. ३०) पुन्हा एकदा महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या परत पाठविल्या. 

शहरातील रस्त्यांवर पडून असलेला कचरा हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव येथील जागांवर टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणीच ओला-सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याचे आश्‍वासन नागरिकांना देण्यात आले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. हर्सूलमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचरा टाकण्यास तीव्र विरोध होत आहे. नगरसेवक पूनम बमणे यांच्यासह नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी कचऱ्याचे ट्रक परत पाठविले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा कचऱ्याचे ट्रक अधिकाऱ्यांनी हर्सूलला नेले. नेहमीप्रमाणे त्या गाड्या परत पाठविण्यात आल्या. 

मशीन खरेदीचा निर्णय होईना 
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक प्रभागात तीन याप्रमाणे २७ मशीन खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १९ मे रोजी या निविदा उघडण्यात येणार होत्या; मात्र अद्याप हा विषय आयुक्तांकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी महापौरांनी मशीन खरेदीच्या निविदांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे पत्र आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले आहे.

Web Title: garbage oppose in harsul