सांस्कृतिक मेजवानी अन्‌ तापलेले राजकीय वातावरण 

अभय कुळकजाईकर 
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

उत्साहात पार पडलेले बालनाट्य संमेलन, बावरीनगरमध्ये झालेली धम्मपरिषद, राष्ट्रीय हॉकी स्पर्धा, साहित्य संमेलन व्याख्यानमाला, विद्यापीठात कलाविष्कार आदींतून नांदेडकरांना जानेवारीत सांस्कृतिक-क्रीडा मेजवानी मिळाली. नोटाबंदीवरील आंदोलन आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीनिमित्त याच महिन्यापासून राजकारण तापू लागले... 

उत्साहात पार पडलेले बालनाट्य संमेलन, बावरीनगरमध्ये झालेली धम्मपरिषद, राष्ट्रीय हॉकी स्पर्धा, साहित्य संमेलन व्याख्यानमाला, विद्यापीठात कलाविष्कार आदींतून नांदेडकरांना जानेवारीत सांस्कृतिक-क्रीडा मेजवानी मिळाली. नोटाबंदीवरील आंदोलन आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीनिमित्त याच महिन्यापासून राजकारण तापू लागले... 

नांदेड जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा होताच जानेवारीपासूनच वातावरण तापायला सुरवात झाली. 16 फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, उमेदवारांच्या मुलाखती, उमेदवार निश्‍चिती, बैठका, आयाराम-गयाराम, अर्ज भरण्याची प्रक्रिया आदींमुळे सर्वच पक्षांत धांदल उडाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या प्रमुख पक्षांसह इतरही पक्ष; तसेच बंडखोर, अपक्षही रिंगणात उतरले आहेत. प्रमुख आणि अन्य पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहेत. सध्या जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसची सत्ता असली, तरी ती टिकविण्याठी या वेळी मात्र राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपने कॉंग्रेससमोर तगडे आव्हान दिले आहे. भाजप, शिवसेनेने सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली आहे, तर अधिकाधिक जागांसाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी, लक्षवेधी ठरणार आहे. 

नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केल्यामुळे सामान्य शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, विद्यार्थी, नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप करीत या चुकीच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी कॉंग्रेसने आंदोलन केले. महिलांचा समावेश असलेला मोर्चाही काढला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सहभागी झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही थाळीनाद आंदोलन करीत नोटाबंदीचा निषेध केला. 

दुसरे बालनाट्य संमेलन 
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे दुसरे बालनाट्य संमेलन नांदेडमध्ये झाले. संमेलनाध्यक्षा म्हणून कांचन सोनटक्के, तर स्वागताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण होते. विविध सहा ठिकाणच्या व्यासपीठांवर सादर झालेल्या नाट्यछटा, नाटकांनी नांदेडकरांना मेजवानी दिली. ज्येष्ठ अभिनेते, परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, दिग्दर्शक विनोद लव्हेकर, अभिनेत्री नूपुर चितळे यांची प्रकट मुलाखत लक्षवेधी ठरली. 

विद्यापीठात "आविष्कार' 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अकरावी राज्य आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धा, "आविष्कार' झाली. राज्यभरातून 19 विद्यापीठांच्या 562 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाले. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उपविजेतेपद, तर मुंबई विद्यापीठाने तिसरा क्रमांक पटकाविला. 

जालंधरने पटकाविला करंडक 
श्री गुरुगोविंदसिंघजी सुवर्णचषक राष्ट्रीय हॉकी स्पर्धा नांदेडला झाली. विविध भागांतील नामवंत संघ सहभागी झाले होते. जालंधर (पंजाब) येथील इंजिनिअरिंग व मेकॅनिकल समूहाने विजेतेपदाचा करंडक पटकाविला. पूर्व मुंबई संघाला उपविजेतेपद, तर पोर्ट ट्रस्ट मुंबईला तिसरे स्थान मिळाले. श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी ही स्पर्धा होते. 

बावरीनगरमध्ये धम्मपरिषद 
नांदेडपासून दहा किलोमीटरवरील दाभड (ता. अर्धापूर) परिसरातील बावरीनगरला दरवर्षी अखिल भारतीय धम्मपरिषद होते. यंदाची परिषद नुकतीच झाली. देश-विदेशातून भिक्‍खू संघ व धम्म उपासकांनी हजेरी लावली. परिषदेचे संयोजक डॉ. एस. पी. गायकवाड हे असून, जागतिक स्तरावर बावरीनगरचे नाव पोचविण्यासाठी ते अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. 

रंगली व्याख्यानमाला 
अंदमान येथे झालेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून आर्थिक मदत करण्यात आली. श्री. मोरे यांनी ती संशोधनवृत्तीचा विनियोग करण्यासाठी वापरली. त्यातून दरवर्षी तीनदिवसीय साहित्य संमेलन व्याख्यानमाला घेतली जात आहे. त्यानुसार अर्थतज्ज्ञ अभय टिळक, वक्ते प्रदीप रावत आणि प्राचार्य गुलाम समदानी कंधारकर यांची प्रकट मुलाखत असे कार्यक्रम पार पडले. बरबडा (ता. नायगाव) येथे दोनदिवसीय राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन झाले. त्याचबरोबर शेषराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलनही झाले. 

बसव महामोर्चाने वेधले लक्ष 
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकांचा दर्जा द्यावा, नांदेडमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथे बसव महामोर्चा काढण्यात आला. त्यात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. 

भाजी-भाकरीची पंगत "ग्लोबल' 
हदगाव तालुक्‍यातील तामसा येथे बारालिंग मंदिरात भाजी-भाकरीची पंगत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली. सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या पंगतीला जवळपास सव्वाशे वर्षांची परंपरा असून, ही पंगत आता सोशल मीडियाच्या माध्यमातून "ग्लोबल' झाली आहे. यंदाही मराठवाड्यासह विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेशातून हजारो भाविकांनी हजेरी लावली. 80 क्विंटल भाजी, 60 क्विंटलच्या भाकरी करण्यात आल्या होत्या, हे विशेष. 

Web Title: Good day for voters...