नव्या खेळांच्या कार्यकारिणींची माहिती सरकारने मागवली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

औरंगाबाद - राज्याच्या क्रीडा संचालनालयाने पाच वर्षांच्या अवधीत 47 नवीन खेळांना मान्यता दिली. या खेळांची माहिती आता सविस्तरपणे राज्याच्या क्रीडा विभागाकडून मागवण्यात आली असून ती सरकार दरबारी सादर करण्यात येणार आहे.

औरंगाबाद - राज्याच्या क्रीडा संचालनालयाने पाच वर्षांच्या अवधीत 47 नवीन खेळांना मान्यता दिली. या खेळांची माहिती आता सविस्तरपणे राज्याच्या क्रीडा विभागाकडून मागवण्यात आली असून ती सरकार दरबारी सादर करण्यात येणार आहे.

27 मार्चपूर्वी ही माहिती मागवण्यात आल्याने क्रीडा संघटनांना आता पळापळ करावी लागणार आहे. या खेळांमध्ये 2013-14 मध्ये चॉयक्वोंदो, फिल्ड आर्चरी, फुटबॉल टेनिस, कुडो, रोप स्किपिंग, सेपाक टकरॉ, सिलंबम, सॉफ्ट टेनिस, टेनिक्वाइट, टेनिसबॉल क्रिकेट, टेनिस व्हॉलीबॉल, थांगता मार्शल आर्ट, जंपरोप, ट्रॅडिशनल रेसलिंग, रस्सीखेच, वुडबॉल, पॉवरलिफ्टिंग, सेलिंग, कयाकिंग, कॅनोइंग, कराटे, स्क्वॉश, वुशू, शुटिंगबॉल अशा क्रीडाप्रकारांना मान्यता देण्यात आली. 2014-15 या वर्षात संगीतखुर्ची, आष्टेडू आखाडा, स्पोर्टस्‌ डान्स, हापकिडो बॉक्‍सिंग, लगोरी, कुराश, बुडो मार्शल आर्ट, मॉंटेक्‍स बॉल क्रिकेट, पेंटयाक्‍यू, लंगडी, रग्गी, फ्लोअरबॉल, जित कुन दो, चॉकबॉल, स्पीडबॉल, तेंद सु डो या खेळांना मान्यता मिळाली होती. 2016-17 या वर्षात थाय बॉक्‍सिंग, सुपर सेवन क्रिकेट, कॉर्फबॉल, मिनी गोल्फ, टेबल सॉकर, युनिक्वाइट, फुटसाल, मॉडर्न पेंटॅथलॉन या आठ नव्या खेळांना मान्यता देण्यात आली.

या खेळांना मान्यता दिल्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावर ही माहिती मागविण्यात आली आहे. त्यात नव्या खेळांच्या राज्य क्रीडा संघटनांना संलग्न जिल्हा संघटनांची यादी, खेळाडूंची संख्या, कार्यालयाचा अधिकृत पत्ता, जिल्हानिहाय खेळाडूंची यादी, पत्ता, दूरध्वनी क्रमांक अशी माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच शालेय, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची संख्या, संघटनेच्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची संख्या आदी माहिती द्यावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आलेल्या नव्या खेळांच्या संघटनांनी सविस्तर माहिती तत्काळ क्रीडा संचालनालयाकडे पाठवणे बंधनकारक असल्याचे सहसंचालक एन. एम. सोपल यांनी सांगितले.

Web Title: Govt asked to inform about new sports committee