पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

हे पती-पत्नी आई-वडिलांपासून वेगळे राहत होते. त्यांची दोन मुले आजी-आजोबांकडे राहत असून, मोठा मुलगा शुक्रवारी सकाळी त्याचे कपडे आणण्यासाठी घरी गेला असता, त्याला आई पलंगाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली

सिल्लोड - गोळेगाव खुर्द (ता. सिल्लोड) येथे पतीने पत्नीची हत्या करून विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. 12) घडली. किशोर काळे (वय 40) याने पत्नी कविता काळे (वय 33) हिच्या डोक्‍यात कडक वस्तूने वार केला. यानंतर किशोरने शेतात जाऊन विषारी औषध पिले.

गावातील मुले बकऱ्या चारण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शेताकडे जात असताना किशोर काळे हा त्याच्या बखारीजवळ पडलेला दिसून आला. मुलांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता, किशोर मृताअवस्थेत आढळून आला. यानंतर अजिंठा पोलिसांना कळविण्यात आले. हे पती-पत्नी आई-वडिलांपासून वेगळे राहत होते. त्यांची दोन मुले आजी-आजोबांकडे राहत असून, मोठा मुलगा शुक्रवारी सकाळी त्याचे कपडे आणण्यासाठी घरी गेला असता, त्याला आई पलंगाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने आजोबांना कळविले. अजिंठा पोलिसांनी दोन्ही घटनांचा पंचनामा करून पती-पत्नीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पानवडोद बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. कविता काळे हिचा भाऊ विनोद सोनवणे (रा. भोरखेडा, ता. भोकरदन) याने दिलेल्या फिर्यादीवरून मृत किशोर काळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज चौधर, कर्मचारी आबासाहेब आव्हाड तपास करीत आहेत.