सकलेश्‍वरातील मूर्ती हलविण्यास नागरिकांचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

अंबाजोगाई - येथील सकलेश्‍वर (बाराखांबी) मंदिर परिसरात सापडलेल्या पुरातन मूर्ती व शिल्प हलविण्यास अंबाजोगाईकरांतून विरोध होत आहे. या भागातील प्राचीन वैभव व समृद्ध वारसा येथेच जतन करण्यासाठी संग्रहालय व्हावे अशी मागणी विविध संघटना व इतिहासप्रेमींतून होत आहे. तशा मागणीचे निवेदनही शुक्रवारी (ता. 31) मुंबई व औरंगाबाद पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयांना पाठविण्यात आले. 

अंबाजोगाई - येथील सकलेश्‍वर (बाराखांबी) मंदिर परिसरात सापडलेल्या पुरातन मूर्ती व शिल्प हलविण्यास अंबाजोगाईकरांतून विरोध होत आहे. या भागातील प्राचीन वैभव व समृद्ध वारसा येथेच जतन करण्यासाठी संग्रहालय व्हावे अशी मागणी विविध संघटना व इतिहासप्रेमींतून होत आहे. तशा मागणीचे निवेदनही शुक्रवारी (ता. 31) मुंबई व औरंगाबाद पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयांना पाठविण्यात आले. 

उस्मानाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे मयूर ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 30) सकलेश्‍वर मंदिराला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी येथील मूर्ती सुरक्षिततेच्या दृष्टीने तेर येथील रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालयात हलविण्याबाबतचा आढावा घेण्यासाठी येथे आल्याचे सांगितले होते. शुक्रवारी हे वृत्त "सकाळ'मध्ये प्रकाशित होताच, शहरातील इतिहासप्रेमींमधून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. अंबाजोगाई शहराचे प्राचीन संचित इथेच राहिले पाहिजे. ते येथून इतरत्र हलविण्यास विरोध आहे. या शहरातच त्याचे भव्य संग्रहालय करावे अशा मागण्या विविध संस्था व संघटनांनी केल्या आहेत. 

शुक्रवारी सायंकाळपर्यंत या मागण्यांची 25 पत्रे व निवेदने एकत्रित जमा झाली. त्यात संस्कार भारतीचे डॉ. अतुल देशपांडे, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ व प्रियदर्शिनी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे राजकिशोर मोदी, अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे डॉ. शरदराव हेबाळकर, योगेश्‍वरी शिक्षण संस्थेतर्फे गणपत व्यास, खोलेश्‍वर महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी, राष्ट्रसेविका समितीच्या शरयू हेबाळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे चिंतामणी गोस्वामी व दिनकर पसारकर, ग्राहक पंचायत, बेथुजी गुरुजी प्रतिष्ठान व मराठवाडा जनता विकास परिषदेचे डॉ. डी. एच. थोरात, भारतीय स्त्रीशक्‍तीच्या नभा वालवडकर, दासो दिगंबर सेवा प्रतिष्ठानचे आनंद गोस्वामी, प्रभुदेव स्मृती सेवा संस्थेचे विठ्ठल जोशी, स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिरचे संतोष कुलकर्णी यांच्यासह इतर सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी ही मागणी केली आहे. ही सर्व निवेदने दत्तप्रसाद गोस्वामी यांनी पुरातत्त्व विभागाला मेलद्वारे पाठविली आहेत. 

अंबाजोगाई शहरातील मातृ सेवाभावी संस्थेने शहरातील प्राचीन व ऐतिहासिक मूर्ती व शिल्प जतन करण्यासाठी वस्तुसंग्रहालय सुरू करण्याची इच्छा दर्शविली आहे. तसे पत्रही या संस्थेने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाच्या संचालकांना पाठविले आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेचेही वस्तुसंग्रहालय आहे. त्याचे विस्तारीकरण करून त्यात या मूर्ती व शिल्प जतन करता येतील. शहराच्या पर्यटन क्षेत्र विकासाच्या दृष्टीने या मूर्ती इथेच राहिल्या पाहिजेत, असेही मत अनेकांनी व्यक्‍त केले. 

पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष 
अंबाजोगाई शहरात अनेक प्राचीन शिल्प व लेण्या आहेत; परंतु याकडे पुरातत्त्व विभाग गेली अनेक वर्षे दुर्लक्ष करीत आहे. शहराच्या उत्तरेस असलेला हत्तीखाना पक्‍क्‍या खडकात कोरलेला आहे. त्यातील भिंतीवर वेरूळ-अजिंठ्याप्रमाणेच लेण्या कोरलेल्या आहेत. पुरातत्त्व विभागाने त्याचे जतन व सुरक्षितता का केली नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. प्राचीन काळातील अनेक शिल्पंही या भागात आहेत. ती इतरत्र विखुरलेली आहेत. ती एकत्र करून संग्रहित का केली नाहीत, सकलेश्‍वर मंदिर परिसरात मूर्ती निघाल्यानंतरच पुरातत्त्व विभाग का जागे झाले? त्यांनी यापूर्वीच या भागाचे उत्खनन का केले नाही असे विविध प्रश्‍न निर्माण होत आहेत. 

अंबाजोगाईतच संग्रहालय व्हावे 
अंबाजोगाई शहरासह धर्मापुरी, परळी या भागाला ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे तेरसारखे संग्रहालय अंबाजोगाईत व्हावे अशी मागणी राजकिशोर मोदी यांनी केली आहे. येथील प्राचीन वारसा इतरत्र हलविला तर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. या मागणीचे निवेदन पुरातत्त्व विभागाला पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. 

पर्यटन केंद्र करण्याचा प्रयत्न 
अंबाजोगाईत असलेला प्राचीन ठेवा तिथेच राहिला पाहिजे. सकलेश्‍वर मंदिर परिसरातील मूर्ती व शिल्पं इतर कुठेही हलवू नयेत; यासाठी आपण पत्र दिले असून अधिवेशन संपल्यानंतर या विषयावर बैठक घेणार असल्याचे आमदार संगीता ठोंबरे यांनी सांगितले. अंबाजोगाईचा मुकुंदराज परिसर पर्यटन केंद्र होण्यासाठी आपण प्रयत्नात आहोत. त्याचबरोबर वस्तुसंग्रहालय होण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: idol move people opposed