वाचन चळवळ गावापर्यंत पोचवावी - पालकमंत्री लोणीकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

जालना - माणसाच्या जडणघडणीत शिक्षक, पुस्तक यांचे फार मोठे महत्त्व आहे. वाचनामुळे मानवामध्ये प्रगल्भता येते. त्यामुळे वाचनाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोचावी व त्यासाठी शिक्षक, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. जालना ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जालना - माणसाच्या जडणघडणीत शिक्षक, पुस्तक यांचे फार मोठे महत्त्व आहे. वाचनामुळे मानवामध्ये प्रगल्भता येते. त्यामुळे वाचनाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोचावी व त्यासाठी शिक्षक, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. जालना ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात सोमवारी (ता.३०) दोनदिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्‌घाटन पालकमंत्री श्री. लोणीकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. 

श्री. लोणीकर म्हणाले, की पुस्तकांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वातील माहितीचा भांडार आपणास उपलब्ध होतो. ग्रामीण भागातील जनता स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी वाचनालयाच्या अनुदानामध्ये वाढीसाठी मंत्रालयीन स्तरावर आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

वाचनाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोचविण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. 

या वेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, की पुस्तक हेच मानवाचे खरे मित्र आहेत. या पुस्तकांमुळेच मस्तक घडत असून विद्यार्थिदशेतच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत पुस्तकांचे वाचन आणि संग्रह वाढता ठेवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, भास्करराव आंबेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, डॉ. संजीवनी तडेगावकर, औरंगाबादचे सहायक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, राजेश राऊत, पारसनंद यादव, श्री. देशपांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात अ. मा. गाडेकर यांनी भूमिका मांडली. सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या वाचनालयांचा; तसेच ग्रंथदिंडीच्या यशस्वी आयोजनाबाबत लोखंडे महाराज यांचा मंत्रिमहोदयांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी आभार मानले. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता अंबड चौफुलीपासून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजनही करण्यात आले होते.