अध्यक्षपदी खोतकर, उपाध्यक्षपदी टोपे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

जालना - जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे सतीश टोपे यांची बहुमतांनी निवड झाली. श्री. खोतकर यांना ३४ पडली. तर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अवधूत खडके यांना २२ मते पडली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सतीश टोपे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेंद्र पवार यांच्यात लढत झाली. श्री. टोपे यांना ३३, तर श्री पवार यांना २३ मते पडली. श्री. पवार यांनी भाजपच्या वतीने अर्ज सादर केला होता. या निवडणुकीत सर्व सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.

जिल्हा परिषदेतील सत्तेपासून भाजपला रोखण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे नेते राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जेथलिया एकत्र आले. नवयुतीच्या या राजकीय खेळीमुळे भाजपची जबरदस्त पिछेहाट झाली. भाजपच्या बाजूने मतदारांचा कौल असतानाही केवळ अंतर्गत वादामुळे भाजपला हा फटका बसल्याची चर्चा होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरीही दुपारी १२ वाजेपर्यंत हालचाली होत नव्हत्या. दुपारी दीडच्या सुमारास प्रथम भाजप, त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभागृहात आले. अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनिरुद्ध खोतकर, तर भाजपकडून अवधूत खडके आणि महेंद्र पवार या दोघांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता; मात्र ऐनवेळी महेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या पदासाठी श्री. खोतकर आणि श्री. खडके यांच्यात लढत झाली. सर्व मतदारांनी हात उंचावून मतदान केले. त्यात श्री. खोतकर यांना ३४, तर अवधूत खडके यांना २२ मते पडली. 

त्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी निवड झाली. या पदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसकडून सतीश टोपे, तर भाजपकडून महेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीतही सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे यांना ३३, तर महेंद्र पवार यांना २३ मते पडली. श्री. टोपे यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून पी. बी. खपले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी काम पाहिले. या वेळी नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांच्यासह अन्य कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.  सभेदरम्यान कडक पोलिस बंदोबस्त होता. एकूण ५६ सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपचे २२, शिवसेनेचे १४, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, काँग्रेसचे ५ आणि अपक्ष २ सदस्य आहेत. 

तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड
गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून राजकीय क्षेत्रात वावरत असलेले श्री. खोतकर यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर दोन वेळा त्यांनी उपाध्यक्षपदही भूषविले आहे. श्री. खोतकर हे अनुभवी आणि कडक शिस्तीचे राजकारणी म्हणून ओळखले जातात. अधिकाऱ्यांवर त्याचा मोठा वचक आहे.

Web Title: jalna zp shiv sena president