धापपटूंसाठी परभणीची ज्योती ठरली प्रकाशवाट

- आदित्य वाघमारे
बुधवार, 8 मार्च 2017

औरंगाबाद - खो-खो आणि कबड्डीसाठी ओळखला जाणारा परभणी जिल्हा आता मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या मुलींसाठी ओळखला जातो. दिल्ली असो, मुंबई असो वा अन्य शहर. परभणीच्या ज्योती गवतेचा डंका सगळीकडे वाजत आहे. एका सफाई कामगाराची कन्या असलेली ज्योती मॅरेथॉनमध्ये तिच्या कुटुंबीयांसाठी भूषण आहेच; पण ती आता अन्य मुलींसाठीही प्रकाशवाट ठरली आहे.

ज्योतीला लहानपणापासूनच खेळाची आवड; पण वर्ष 2003 मध्ये तिचे वडील परिवहन खात्यातून सफाई कर्मचारी म्हणून निवृत्त झाले. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार पेलणे त्यांना अवघड झाले. त्यात ज्योतीच्या खेळाची आवड कशी जोपासायची, हा प्रश्‍न निर्माण झाला होता. तरीही तिच्या कुटुंबीयांनी तिला प्रोत्साहन दिले. या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत ज्योती घडली. दरम्यान, तिच्या भावाला पोलिस खात्यात नोकरी लागली. ज्योती स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला लागली. सराव दांडगा असल्याने तिच्या नशिबी फारसा पराभव आलाच नाही. लहान शहरातील होणाऱ्या हौशी मॅरेथॉन असो वा मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या हाफ किंवा फुल मॅरथॉन. ज्योतीने पहिल्या तीन स्थानांमध्ये आपली जागा नक्की केली आहे. दिल्लीतील प्रतिष्ठेच्या मॅरेथॉन स्पर्धेतही तिने दुसरे स्थान पटकाविले होते. तिचे हे यश पाहून आता परभणी जिल्ह्यातील अन्य मुलींनाही स्पर्धेत धावण्याचे बळ मिळायला लागले आहे. आता तर परभणीपासून 12 किलोमीटरवर असलेल्या निकिता म्हात्रे आणि कांचन म्हात्रे या भगिनीही पुढे आल्या आहेत. त्या आपल्यासोबत धावतात आणि बक्षिसेही जिंकतात. त्यांच्याही घरची परिस्थिती साथ देणारी नसल्याने त्या स्पर्धेतून जिंकलेल्या पैशांमधून स्पर्धांसाठी जातात; पण धावतात, असे ज्योती सांगते. परिस्थिती रोज सारखी नसते, ती बदलते. त्याच्यामुळे परिस्थितीशी झगडत स्पर्धा केली तर त्याचे यश अधिक मौल्यवान असते, हे सांगायला ग्रामीण भागातून मुलींसाठी अदर्श ठरू लागलेली ज्योती सांगायला विसरली नाही.

Web Title: jyoti guidance for runner