काकासाहेब शिंदेंवर दशक्रिया विधी; मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी

बाळासाहेब लोणे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

यावेळी गोदावरी पूलाला हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतु असे नाव देऊन काकासाहेब यांच्या मातोश्रीच्या हस्ते फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

गंगापूर : मराठाला समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गोदावरी नदीत बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम आज (ता. 1) कायगाव (ता. गंगापूर) येथील रामेश्वर मंदिर परिसरात झाला. काकासाहेब शिंदे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, मुक मोर्चानंतर शांत झालेला मराठा काकासाहेब शिंदे यांच्या आहुतीने पुन्हा पेटून उठला आहे असे सांगत त्यांचे निकटवर्तीय संतोष माने यांनी काकासाहेब शिंदे यांच्या आठवणींना उजळा दिला. 

मराठाला समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काकासाहेब शिंदे या तरुण आंदोलकाने आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी (ता. २३) गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले. यामुळे सकल मराठा समाज आक्रमक झाला होता. यावेळी गोदावरी पूलाला हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतु असे नाव देऊन काकासाहेब यांच्या मातोश्रीच्या हस्ते फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी संजीव भोर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, खुलताबाद काँग्रेसचे जगन्नाथ खोसरे, बाजार समितीचे सभापती संजय जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक शिरसाठ, शिवसेनेचे नगरसेवक भाग्येश गंगवाल, मच्छिंद्र देवकर यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना बाजार समितीचे सभापती संजय जाधव म्हणाले की, काकासाहेब यांनी समाजासाठी दिलेले बलिदान समाज कधीही विसरणार नाही, आरक्षणाचा केंद्रबिंदु म्हणून काकासाहेब अमर राहणार आहे. 

जगन्नाथ खोसरे म्हणाले की, काकासाहेब यांचे आरक्षणरूपी स्मारक उभे राहण्यासाठी समाजाने एकजुट केली पाहिजे. राष्ट्रवादीचे  जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक शिरसाठ म्हणाले की, काकासाहेब यांच्या बलिदानाची दखल देशाबाहेर घेतली असून राज्य सरकारने तत्काळ आरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय द्यावा.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
येथील गोदावरी नदी किनाऱ्यावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  पुणे मार्गाने येणारी वाहने शेवगावमार्गे तर औरंगाबादवरुन जाणारी वाहने पैठणमार्गे वळवण्यात आली होती.  दशक्रिया विधी संपताच अवघ्या चार तासांत वाहतूक सुरळीत करण्यात आली.  यावेळी गोदावरीच्या पात्रात बोटीसह पोहणारे पथक तैनात करण्यात आले होते.

Web Title: kakasaheb shinde dashkriya rituals maratha kranti morcha