लातूर, बीड, उस्मानाबादचे पासपोर्ट कार्यालय सोलापूरला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

लातूर - सोलापूरसह लातूर, उस्मानाबाद, बीड व सांगली जिल्ह्यासाठी सोलापूर येथे स्थापन झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे लवकरच उद्‌घाटन होणार आहे. या कार्यालयातील अंतर्गत कामे वेगाने सुरू असून, ती मेअखेरीस पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या पासपोर्ट कार्यालयाचे जूनमध्ये उद्‌घाटन होणार आहे.

लातूर - सोलापूरसह लातूर, उस्मानाबाद, बीड व सांगली जिल्ह्यासाठी सोलापूर येथे स्थापन झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे लवकरच उद्‌घाटन होणार आहे. या कार्यालयातील अंतर्गत कामे वेगाने सुरू असून, ती मेअखेरीस पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या पासपोर्ट कार्यालयाचे जूनमध्ये उद्‌घाटन होणार आहे.

मराठवाड्यातील नागरिकांना पासपोर्ट मिळविण्यासाठी नागपूरला जावे लागत होते. गेली अनेक वर्षे मराठवाड्यासाठी स्वतंत्र पासपोर्ट सेवा कार्यालय स्थापन करण्याची मागणी होती. त्यासह सोलापूर जिल्ह्याचीही मागणी होती. त्यासाठी स्थानिक खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी प्रयत्न केले. मराठवाड्यासाठी औरंगाबादेत; तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबादसह बीड जिल्ह्यांसाठी सोलापूरला पासपोर्ट कार्यालय मंजूर झाले. त्यानुसार सोलापूर येथे काही महिन्यांपूर्वी पासपोर्ट सेवा लघू केंद्राची सुरवात झाली. महापालिका व विभागीय पासपोर्ट कार्यालयात भाडेकरार होऊन रिपन हॉलची इमारत या कार्यालयास मिळाली आहे. सुमारे 12 हजार चौरस फूट जागेत हे कार्यालय होत आहे. त्यांपैकी चार हजार चौरस फूट जागेत जुने सभागृह, एक हजारात नवीन बांधकाम, दोनशे रनिंग मीटर परिसराच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडे इमारत सुपूर्द होणार आहे.

संपूर्ण देशभरात केवळ चारच लघुपासपोर्ट सेवा केंद्रे मंजूर झाली असून, त्यात सोलापूरचा समावेश आहे. या केंद्रात सोलापूरसह उस्मानाबाद, बीड, सांगली व लातूर या पाच जिल्ह्यांतील नागरिकांना पासपोर्टसाठी अर्ज करता येतील. पासपोर्ट काढण्यास आलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी होईल. ती सहायक पासपोर्ट अधिकाऱ्यांकडे जाईल. त्यामुळे नागरिकांना किमान आठ दिवसांत पासपोर्ट मिळण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूरनंतर सोलापूरला हे पासपोर्ट सेवा केंद्र मिळाले आहे.