आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 20 लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

लातूर जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या आवाहनाला 350 गणेश मंडळांचा प्रतिसाद

लातूर जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या आवाहनाला 350 गणेश मंडळांचा प्रतिसाद
लातूर - लातूर जिल्ह्यात या वर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा झाला. या उत्सवाच्या सुरवातीपासूनच पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी डॉल्बीवरचा खर्च टाळून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 350 गणेश मंडळांनी सुमारे वीस लाख रुपयांची मदत बळिराजा सबलीकरण अभियानास केली आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या वर्षी गणेशोत्सवाच्या सुरवातीपासूनच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केला जावा, अशी भूमिका घेतली होती. जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून बळिराजा सबलीकरण अभियान राबविले जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या अभियानाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. हे लक्षात आल्यानंतर डॉ. राठोड यांनी डॉल्बीवरचा खर्च टाळून तो निधी बळिराजा सबलीकरण अभियानास द्यावा, असे आवाहन गणेश मंडळांना केले होते. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी "सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतदेखील डॉ. राठोड यांनी हा मुद्दा ऐरणीवर घेतला होता.

राठोड यांनी यासाठी ठिकठिकाणी बैठका घेऊन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रबोधनही केले होते. जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनादेखील त्यांनी यासंबंधी सूचना करून पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. जिल्ह्यातील 350 गणेश मंडळे पुढे आली. त्यांनी सुमारे वीस लाखांची मदत या बळिराजा सबलीकरण अभियानास केली. अनेक गणेश मंडळांनी डॉ. राठोड यांना गणेशोत्सवात आरतीला बोलावून हा निधी देऊ केला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळेच गणेशोत्सवाच्या काळात डीजे, डॉल्बीवरचा खर्च टाळून तो निधी बळिराजा सबलीकरण अभियानास द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. डॉल्बीमुक्तीसाठी "सकाळ माध्यम समूहा'नेही पुढाकार घेतला. गणेश मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला. यातून वीस लाख रुपये जमा झाले. लवकरच एक कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात येईल.
- डॉ. शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक, लातूर