परळी दुर्घटनेतील चार कामगारांचा मृत्यू

लातूर - वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना दुर्घटनेतील कामगारांच्या नातेवाइकांची विचारपूस करताना पंकजा मुंडे.
लातूर - वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना दुर्घटनेतील कामगारांच्या नातेवाइकांची विचारपूस करताना पंकजा मुंडे.

लातूर - पांगरी (ता. परळी वैजनाथ) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात उकळत्या रसाच्या टाकीचा स्फोट होऊन गंभीर भाजलेल्यांपैकी चौघांचा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चौघांची प्रकृती गंभीर आहे. 

दरम्यान, कारखान्याच्या अध्यक्षा, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी (ता. नऊ) दुपारी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना कारखाना, शासन व मुंडे कुटुंबीयांतर्फे प्रत्येकी सहा लाख तर जखमींना दीड लाख रुपये मदत, मृताच्या कुटुंबातील एकाला कारखाना सेवेत सामावून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यनाथ कारखान्यात शुक्रवारी (ता. आठ) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. हजारो लिटर क्षमतेच्या टाकीत रस उकळत असताना स्फोट झाला व टाकी फुटली. उकळता रस अंगावर पडल्यामुळे पंधरा कामगार जखमी झाले. त्यापैकी तिघांवर परळीतच उपचार करून त्यांना घरी जाऊ देण्यात आले. दोघांवर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर भाजलेल्या दहा कामगारांना येथील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांच्या रुग्णालयात काल रात्री दाखल करण्यात आले होते. त्यापैकी उपचारानंतर एकाला घरी पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना मधुकर पंढरीनाथ आदनाक (वय ५०, रा. धानोरा, ता. अंबाजोगाई) यांचा मध्यरात्री साडेबारा, सुभाष गोपीनाथ कराड (४५, रा. लिंबोटा, ता. परळी) यांचा मध्यरात्रीनंतर सव्वादोन, गौतम तुकाराम घुबरे (५०, रा. पिंपळगाव, ता. परळी) यांचा आज सकाळी पावणेनऊ, सुनील भागवत भंडारे (२४, रा. देशमुख टाकळी, ता. परळी) यांचा दुपारी साडेचारच्या सुमारास मृत्यू झाला. ३५ टक्के भाजलेले माधव बालाजी मुंडे (२४, रा. पांगरी, ता. परळी) यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. शंभर टक्के भाजलेले सुमेध अनंत भंडारे (१८, रा. देशमुख टाकळी, ता. परळी), नव्वद टक्के भाजलेले राम माणिक नागरगोजे (४५, रा. मांडेखेल, ता. परळी), ६९ टक्के भाजलेले धनाजी राजेश्वरराव देशमुख (४१, रा. पेठगल्ली, परळी), ६३ टक्के भाजलेले लहुदास अभिमान डाके (३०, रा. देशमुख टाकळी, ता. परळी) यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

मुंडे भगिनींकडून सांत्वन, विचारपूस
पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, ॲड. यशश्री मुंडे यांनी दुपारी साडेबाराला रुग्णालयास भेट देऊन जखमी कामगारांची विचारपूस केली. डॉ. लहाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांच्याशी चर्चा केली. मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन करताना त्या गहिवरल्या, ‘‘माझ्या कुटुंबांवरचा हा मोठा आघात आहे. मृत व जखमी माझ्या कुटुंबांतीलच आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी माझी आहे,’’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

गत २१ वर्षांत अनेक जखमींवर उपचार करून त्यांना बरे केले. मात्र, वैद्यनाथ कारखान्याचे कामगार खूपच गंभीर भाजले आहेत. त्यातील चौघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणे जमले नाही, याचे दुःख आहे. उपचारादरम्यान माझ्या रुग्णालयात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण मृत होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.   
- डॉ. विठ्ठल लहाने, प्लास्टिक सर्जन, लातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com