रस्त्यावर भाजीपाला फेकून भूमाता ब्रिगेडचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

लातूर - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी (ता. 8) येथील शिवाजी चौकात रस्त्यावर भाजीपाला फेकून आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलन करणाऱ्या ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांच्यासह 14 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आंदोलनाच्या वेळी पोलिस व कार्यकर्त्यांत झटापट झाली.

सकाळी शिवाजी चौकात तृप्ती देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जमून रस्त्यावर भाजीपाला फेकून निदर्शने केली. देसाई यांना महिला पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिस व कार्यकर्त्यांत झटापट झाली. देसाई यांनी पोलिस व्हॅनमध्ये बसण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून पोलिस ठाण्यात नेण्यात आले.