धम्माची पताका भारतभर नेणे गरजेचे - भीमराव आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

लातूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती केली; पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर या समाजाने केवळ राजकीय पक्षांसाठीच योगदान दिले. "जय भीम'मुळे राजकीय ओळख निर्माण झाली आहे.

लातूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती केली; पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर या समाजाने केवळ राजकीय पक्षांसाठीच योगदान दिले. "जय भीम'मुळे राजकीय ओळख निर्माण झाली आहे.

धम्मकार्याकडे मात्र दुर्लक्ष झाले. भिक्‍खुसंघ व भारतीय बौद्ध महासभा ही धम्म चळवळीची दोन चाके आहेत. या दोघांनी मिळून धम्माची पताका भारतभर नेली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी येथे केले.

येथील भिक्‍खू पय्यानंद यांच्या पाचव्या वर्षावास समारोपानिमित्त रविवारी (ता. 22) येथे आयोजित अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

धम्मक्रांतीला 61 वर्षे पूर्ण होत आहेत. हे परिवर्तन साधे नव्हते. देशाचा इतिहास-भूगोल बदलून गेला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या समाजाने मोठे राजकीय योगदान दिले. "जय भीम' अशी ओळख तयार झाली; पण त्यासोबतच धम्मकार्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष झाले.

सध्याचा काळ कठीण आहे. बाबासाहेबांना व त्यांच्या विचारांना विरोध करणारे आज केंद्रात व राज्यात सत्तेत आहेत. काळ कठीण आहे. संकटे येत आहेत, ती सोडविण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. धम्म चळवळीत इतर दलित समाजही येऊ इच्छित आहे. त्यांना सोबत घेण्याची गरज आहे. चळवळ गतिमान करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

समाजातील मुलांनी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याऐवजी वकील, अर्थशास्त्रज्ञ असे दुसरे करिअर निवडावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.