'सीईओं'नी स्वतः केले गटार साफ; दिली स्वच्छतेची दवंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी आज कासारबालकुंदा येथे सकाळी जाऊन स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ग्रामस्थाना प्रवृत्त केले.

निलंगा : लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी बुधवारी निलंगा तालुक्यातील कासारबालकुंदा येथे थेट हातात फावडे घेऊन गटार साफ करत गावकऱ्यांना स्वच्छतेबाबत संदेश दिला. शिवाय स्वतः हालगी वाजवत गावात शौचालय बांधकाम करणे व शौचालयाचा वापर करण्यासाठी गावात दवंडीही दिली.

याबाबतची माहीती अशी की, सध्या स्वच्छतेवर मुख्यकार्यकारी आधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचा आधिक जोर असून शौचालय बांधकाम व त्याचा नियमितपणे वापर करण्यासाठी आधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका घेऊन सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी आज कासारबालकुंदा येथे सकाळी जाऊन स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ग्रामस्थाना प्रवृत्त केले.

गावातील नाली उपसण्याचे काम स्वतः हातात फावडे घेऊन गटार उपसण्याचे काम केले. शिवाय गावात वृक्षारोपण, शौचालय वापर, शौचालय बांधकाम आदीबाबत मार्गदर्शक केले. यावेळी जिल्हापरिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपमुख्यकार्यकारी आधिकारी डॉ. संजय तुबाकले, गटविकास आधिकारी आर. व्ही. मुक्कावार यासह विस्तार आधिकारी, सर्व ग्रामसेवक उपस्थितीत होते.