धर्मादाय आयुक्त रमले मुन्नामामांच्या गप्पांत 

धर्मादाय आयुक्त रमले मुन्नामामांच्या गप्पांत 

लातूर - माणूस मोठा झाला की लहान माणसांना विसरून जातो, असा सार्वत्रिक अनुभव आपणास नेहमीच येत असतो. त्यात दिव्याची गाडी मिळाली तर त्याचा तोरा न्याराच असतो; पण एखादा चळवळीतून पुढे आलेला तरुण महत्त्वाच्या पदावर गेल्यावरही गावच्या लोकांना विसरत नाही. असाच काहीसा प्रकार येथे पाहायला मिळाला. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी मंगळवारी (ता. 12) मुन्ना मामांचे दुकान गाठले. तीस वर्षांपूर्वी येथे चाखलेल्या चिवड्याबरोबरच गावच्या आठवणी काढत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मामांच्या दुकानातील चिक्कीचा स्वाद त्यांनी घेतला. दररोज आपल्या हातचा चिवडा खाणारा तरुण राज्याचा धर्मादाय आयुक्त झाल्याचे पाहून मुन्नामामांनाही गहिवरून आले होते. 

धर्मादाय आयुक्त डिगे हे लातूरचेच सुपुत्र. त्यांचे शालेय शिक्षण केशवराज विद्यालयात झाले. या विद्यालयात डिगे यांच्या हस्ते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव झाला. या कार्यक्रमात त्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला. शिष्यवृत्तीतील गणित मला कधीच जमले नाही; पण आयुष्याचे गणित कळाल्याने आज मी कोणतेही काम करू शकतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

एक खोडकर मुलगा म्हणूनच त्यांची शाळेत ओळख राहिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा तरुणही त्यांच्या रूपाने लातूरकरांनी पाहिला होता. शाळेचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांची गाडी शाळेजवळच असलेल्या एका भेळेच्या गाड्यासमोर उभी राहिली. हा भेळचा गाडा होता लक्ष्मीकांत चौधरी ऊर्फ मुन्नामामांचा. डिगे यांना पाहून मुन्नामामांना खूपच आनंद झाला. त्यांनी स्नेहाने दिलेल्या चिक्कीचा स्वाद घेत डिगे यांनी आनंद व्यक्त करत मुन्नामामांचा निरोप घेतला. हा आगळा स्नेहसोहळा केशवराज विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष शिवदास मिटकरी जवळून पाहत राहिले. 

मुन्नामामांना मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. शाळेत असताना भूक लागली, की त्यांच्याकडून चिवडा खायचो. पैसे नसले तरी त्यांनी कधीच नाही म्हटले नाही. तीस वर्षांपासूनचे हे आमचे नाते आहे. 
- शिवकुमार डिगे, धर्मादाय आयुक्त. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com