अतिक्रमण विभागाकडून गाड्यांची नासधूस

अतिक्रमण विभागाकडून गाड्यांची नासधूस

लातूर - येथील औसा रस्त्याच्या कडेला गाडा लावून खाद्य पदार्थ विकून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या गाड्यांची महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने नासधूस केली. यात अन्नपदार्थांचे नुकसान करण्यात आले. नोटिसा न देताच ही कारवाई केल्याने या प्रकाराबद्दल लहान व्यावसायिकांत महापालिकेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. 

शहरातील औसा रस्ता हा एक महत्त्वाचा रस्ता आहे. सातत्याने या रस्त्यावर गजबज असते. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर लहान व्यावसायिक गाडे लावून त्यावर खाद्यपदार्थ विक्री करीत आहेत. त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन आहे. यातील बहुतांशी गाडे हे वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी उभे असतात. अचानक सोमवारी (ता. २७) महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या या गाड्यांची नासधूस केली. गाड्यांमध्ये असलेल्या अन्नपदार्थांचीही नासधूस केली. यात लहान व्यावसायिकांचे मात्र नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात महापालिकेबद्दल नाराजी पसरली आहे. 

महापालिकेने काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन गंजगोलाईतील अतिक्रमणे काढली होती. तसेच शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे व धार्मिक स्थळेही काढली होती, पण यापूर्वी त्यांना महापालिकेने नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर ही अतिक्रमणे काढण्यात आली होती. मात्र, आजच्या कारवाईत महापालिकेने कोणालाही नोटीस न देता ही कारवाई केल्याने अधिक नाराजी पसरली आहे. 

महापालिकेच्या वतीने सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्याचा हा एक भाग आहे. संबंधित लहान व्यावसायिकांचे एक शिष्टमंडळ महापालिकेत आले होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. 
-त्र्यंबक कांबळे, सहायक आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com