लातूर, रेणापूरला पावसाने झोडपले

विकास गाढवे
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

एकट्या रेणापूर महसूल मंडळात तब्बल १६० मिलीमीटर तर लातुरात ६७ मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे परतीच्या चांगल्या पावसाची चाहुल शेतकऱ्यांना लागली आहे.

लातूर : दोन दिवसाच्या उघडीपीनंतर शहर व जिल्ह्यात मंगळवारी (ता. १२) रात्री पावसाने पुन्हा जोमदार हजेरी लावली. उदगीर, जळकोट व देवणी वगळता उर्वरित सात तालुक्यात पावसाने हजेरी लावली. यात लातूर व रेणापूरला पावसाने झोडपून काढले.

एकट्या रेणापूर महसूल मंडळात तब्बल १६० मिलीमीटर तर लातुरात ६७ मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे परतीच्या चांगल्या पावसाची चाहुल शेतकऱ्यांना लागली आहे.

मंगळवारी सायंकाळपासूनच शहरात पावसाला सुरवात झाली. रात्री आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर काहीवेळ खंड देत रात्री उशिरा पावसाला सुरवात झाली. रात्रभर कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत होता. पहाटेपासून पुन्हा पावसाने दणका दिला. यातूनच लातूर, रेणापूर, औसा व निलंगा तालुक्यात जोरदार तर अहमदपूर, चाकूर व शिरूर अनंतपाळ तालुक्यात तुरळक पाऊस झाला. रेणापूर तालुक्यात रेणापूर मंडळातच सर्वाधिक पाऊस झाला आहे.

तालुक्यातील पोहरेगाव मंडळात २०, कारेपूर - ३९ व पानगाव मंडळात तीस मिलीमीटर पाऊस पडला. लातूर तालुक्यातही लातूर शहरातच जास्त पावसाची नोंद झाली. तालुक्यातील कासारखेडा मंडळात ४८, तांदुळजा - ४५ व मुरूड मंडळात ४१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. निलंगा शहरात ५७, अंबुलगा मंडळात ४०, मदनसुरीत ३६ तर औराद शहाजानी मंडळात ३७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिंपळफाट्यावरील (ता. रेणापूर) वीजेचे दोन खांब कोसळून वीज पुरवठा खंडीत झाला. लातुर शहरातही रात्री उशिरापर्यंत वीज बंद होती. मंगळवारी जिल्ह्यात सरासरी १५ मिलीमीटर पाऊस झाला असून या पावसाने जिल्ह्यातील पाऊस सरासरीच्या ७५ टक्क्यापर्यंत पोहचला आहे. 

टॅग्स