‘रिजेक्ट’ सोयाबीन ‘सिलेक्ट’

‘रिजेक्ट’ सोयाबीन ‘सिलेक्ट’

लातूर - शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कशी अडवणूक केली जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी (ता. ८) सकाळी येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर घेतला. ग्रेडरने ‘रिजेक्ट’ केलेल्या सोयाबीनची थप्पी केंद्रात लावण्यात आली होती. त्यातील काही माल देशमुख यांनी काढून पुन्हा मशिनवर मोजायला लावला. तर त्यात हे सोयाबीन ‘सिलेक्ट’ झाले. संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले. शासकीय अधिकाऱ्यांमुळेच शासनाच्या योजना फेल ठरत असल्याची भावना देशमुख यांनी या वेळी व्यक्त केली. 

सहकारमंत्री देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी येथे शासकीय खरेदी केंद्र व शेतमाल तारण योजनेची आढावा बैठक घेतली. बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी सोयाबीन खरेदी केंद्रांवर कशा पद्धतीने अडवणूक सुरू आहे, याचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला. 

औसाच्या खरेदी केंद्रावर खरेदी केलेला माल लातूरच्या गोदामात आणून टाकला जात आहे. तेथील गोदाम रिकामेच ठेवले जात आहे, असे सोमवंशी यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले. देशमुख यांनी तातडीने वखार महामंडळाच्या वरिष्ठांना मोबाईलवर बोलून तेथील गोदाम उपलब्ध करून दिले. वाहतूकदारांना जगवण्याचे हे षडयंत्र आहे. मुंबईत बसून आम्हाला हे कळत नाही. त्यामुळे आता लातूर ते नागपूरला जाताना सर्व जिल्ह्यांत ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी करीत आहे, असे देशमुख म्हणाले. 

ठिकठिकाणी उद्रेक दिसत आहे. अधिकाऱ्यांमुळेच शासनाच्या योजना फेल ठरत आहेत. नाफेड व वखार महामंडळ यांच्यात काहीच समन्वय नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी जाऊन अडचणी समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे, असे सहकारमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर देशमुख यांनी येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्राला भेट दिली. तेथे काही रिजेक्ट केलेले सोयाबीन पोती ठेवली होती. देशमुख यांनी त्यातील सोयाबीन बाहेर काढले. ग्रेडरला बोलावून हे का रिजेक्ट केले याची माहिती घेतली. त्याला पुन्हा हे सोयाबीन खराब माल, आर्द्रता मोजण्याच्या मशिनवर घ्यायाला सांगितले. तर ते सोयाबीन सिलेक्ट झाले. यातून शेतकऱ्यांची कशी अडवणूक केली जाते, हे मंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर याचा अहवाल तातडीने वरिष्ठांना पाठवून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर खरेदी केंद्रावर सलेक्ट केलेला माल वेअरहाउसला रिझेक्ट केला जातो, हा प्रकारही समोर आला. वेअरहाउसला काही देणे-घेणे केले नसल्याने तो रिजेक्ट केला असेल, अशी टिप्पणी करून संबंधितांवरही कारवाईचे आदेश देशमुख यांनी दिले. 

बैठकीला मंत्र्यांचे विशेष अधिकारी संतोष पाटील, आमदार  विनायक पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, महापौर सुरेश पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, सचिव मधुकर गुंजकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com