हिंदू राष्ट्र बनविण्याचा डाव हाणून पाडणार - असदुद्दीन ओवेसी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

लातूर - 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवले नसते, तर हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र बनले असते. संविधानामुळेच हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र बनू देणार नाही. हा डाव हाणून पाडला जाईल,' असे स्पष्ट करीत भाजपकडून राष्ट्रवादाच्या; तर कॉंग्रेसकडून धर्मनिरपेक्षतेच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही. असे प्रमाणपत्र माझ्या पायाच्या धुळीचीसुद्धा बरोबरी करणार नाही, अशी खरमरीत टीका "एमआयएम'चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी येथे केली.
"एमआयएम' व महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (ता. सात) आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष ऍड. अण्णाराव पाटील अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर प्रा. सुरेश वाघमारे, ताहेर सय्यद, बसवंत उबाळे, अफजल कुरेशी, राजकुमार सस्तापुरे, मोईन सय्यद, प्रभाकर काळे उपस्थित होते.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेना यांनी मुस्लिम, दलित, धनगर या समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. तुम्हाला गुलाम म्हणूनच वागविण्यात आले. या पक्षांची गुलामी करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. ही गुलामी सोडून तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. आम्ही आता लढू लागलो; तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पोटात दुखत आहे. भाजपकडून पैसे घेऊन बोलतो, असे आरोप केले जात आहेत. 1998 ते 2012 पर्यंत कॉंग्रेसच्या नादी लागलो होतो. त्या वेळी कॉंग्रेसने किती पैसे दिले, हे त्यांनी सांगावे. त्याच्या नव्वद टक्के पैसा मी त्यांच्या पक्षासाठी निधी म्हणून देईन. मी मरेन; पण समाजाशी बेइमानी करणार नाही, असे श्री. ओवेसी यांनी स्पष्टपणे नमूद केले. ऍड. पाटील, श्री. सय्यद, श्री. उबाळे यांचीही भाषणे झाली.

कॉंग्रेसमध्ये दम राहिलेला नाही
सध्या तर कॉंग्रेस स्वतःलाच वाचवू शकत नाही. त्यांचा "लहान मुलगा' कधी मोठा होतच नाही. कॉंग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करू शकत नाही. कॉंग्रेसमध्ये दमच राहिला नाही. बाबरी मशिदीच्या वेळीच कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षतेची खिल्ली उडवल्याचे देशाने पाहिले आहे, असे श्री. ओवेसी म्हणाले.

लातूर महापालिकेच्या निवडणुकीत तुमची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. येथे देशमुखांच्या गुलामीत तुम्ही आहात. त्यांचे नाव देशमुख असले तरी माझे नाव ओवेसी आहे. येथे कोणीच गुलाम राहणार नाही, याचे वचन देतो. धनचंद्र व शारदा कन्स्ट्रक्‍शनची दुकाने बंद केली जातील. उपेक्षित सर्व घटकांचा विकास केला जाईल, असे आश्वासन श्री. ओवेसी यांनी या वेळी दिले.

Web Title: make the game Hindu nation