ग्लेशियरमध्ये शिडी घसरली; समिटपूर्वी रेग्युलेटर बिघडले

आदित्य वाघमारे
सोमवार, 28 मे 2018

औरंगाबाद - ‘गतवर्षी जिथून माघारी फिरले तिथेच यंदा ऑक्‍सिजन सिलिंडरचे रेग्युलेटर बिघडल्याने चढाई अवघड झाली. तीन वर्षांचा सराव असतानाही ग्लेशियरमध्ये शिडी घसरली आणि अंधाऱ्या दरीत खाली मुंडके वर पाय झाले; पण परिश्रम आणि सर्वांच्या शुभेच्छांसह सलग सत्तावीस तास चालत एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न साकार झाले,’ असा अनुभव प्रा. मनीषा वाघमारेने ‘सकाळ’ला सांगितला. 

औरंगाबाद - ‘गतवर्षी जिथून माघारी फिरले तिथेच यंदा ऑक्‍सिजन सिलिंडरचे रेग्युलेटर बिघडल्याने चढाई अवघड झाली. तीन वर्षांचा सराव असतानाही ग्लेशियरमध्ये शिडी घसरली आणि अंधाऱ्या दरीत खाली मुंडके वर पाय झाले; पण परिश्रम आणि सर्वांच्या शुभेच्छांसह सलग सत्तावीस तास चालत एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न साकार झाले,’ असा अनुभव प्रा. मनीषा वाघमारेने ‘सकाळ’ला सांगितला. 

गतवर्षी मनीषाला अवघ्या १७० मीटरवरून माघारी फिरावे लागले होते. त्यानंतर तिने सलग दुसऱ्या वर्षी तयारी करून यंदा आपले स्वप्न साकार केलेच. यादरम्यान तिला जिवावर बेतणाऱ्या दोन मोठ्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. इच्छाशक्तीच्या जोरावर या संकटांवर लीलया मात करीत मनीषाने यशाला गवसणी घातली. एव्हरेस्टच्या माथ्याकडे जातानाचे असलेले कॅम्प एक आणि दोनदरम्यान मोठे ग्लेशियर तयार झाले होते. त्यापैकी एक ओलांडताना मनीषा शिडीहून घसरली आणि शिडीसह खाली खोल दरीत लटकली. खाली डोके, वर पाय अशी तिची अवस्था झाली 
होती; पण वेळीच गळ्यात अडकविलेली शिट्टी हाती आल्याने शेर्पाला सावध करता आले. त्यातून बाहेर येण्यासाठी दहा मिनिटे लागली; पण त्या काळात आपल्या डोळ्यांसमोर तारे चमकल्याचे मनीषाने सांगितले. 

‘त्याच’ जागेवर उद्भवली समस्या
जाताना वातावरणाची साथ असल्याने कॅम्प फोरपर्यंतचा प्रावास वेगाने आणि बिनधोक पार पडला. समिट पॉइंटकडे सरकताना गेल्यावर्षी जिथून माघारी फिरले तिथेच पुन्हा समस्या उद्भवली. सिलिंडरमधून ऑक्‍सिजनचा पुरवठा नाकापर्यंत आणण्याचे महत्त्वाचे काम करणारे रेग्युलेटर बिघडले आणि मनीषा पुन्हा संकटात सापडली. रेग्युलेटर हवे असल्यास माघारी जाण्याचा सल्ला शेर्पाने दिला; पण तिला ते मान्य नव्हते. शेवटी सामंजस्याने शेर्पाचा ऑक्‍सिजन मास्क दोघांत अर्धा-अर्धा तास वापरत यशाचे शिखर गाठले. तिथून परत साऊथ समिटपर्यंत यायला दोन तास लागले. या वेळेत शेअरिंगमध्ये मास्क वापरून आपण मोहीम फत्ते केल्याचे मनीषाने सांगितले. 

परतीच्या प्रवासात दिसले दोन मृतदेह
बाल्कनी या भागात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या या ठिकाणी सुमारे २४ जण पुरले गेले असल्याचा अंदाज आहे. वाऱ्याने बर्फ हटला, की येथील मृतदेह वर येतात आणि मी खाली उतरताना नेमके तेच झाले. बर्फ हटल्याने दोन मृतदेह उघडे पडले. हे पाहून मनात धस्स झाले आणि क्षणभर थबकले; पण शेर्पाने त्याकडे लक्ष न देण्याचे सांगत वेगाने मर्गक्रमण करण्याचा सल्ला दिला. आपण ते ऐकले पुढचा प्रवास सुरू केला, असे मनीषाने सांगितले. 

लिक्विड फूडने ऊर्जा
साधारण कॅम्प टू ओलांडले, की अन्न पोटात राहत नाही आणि खाल्लेही जात नाही. थंडीत शरीराची झीज होताना अन्न नासण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. ही बाब आपल्याबाबत लागू पडली नाही. आपण कॅम्प टूनंतर मिळेल तिथे लिक्विड फूड घेत गेल्याचा आपल्याला फायदा झाल्याचे मनीषाने सांगितले. कॅम्प फोरवरही आपण लिक्विड फूड घेतल्याने शरीरात ऊर्जा राहिल्याचे तिने सांगितले.

दहा मिनिटे शिखरावर; पण समाधान नाही
माउंट एव्हरेस्टवर जाऊन थोडा वेळ घालवावा, असे मनात होते; पण रेग्युलेटर बिघडले आणि त्यावर बंधन आल्याने समिट पॉइंटवर दहा मिनिटे थांबता आले. वातावरणात सकाळी दहानंतर बिघाड अपेक्षित असल्याने माघारी फिरावे लागले. त्यापूर्वीच वातावरणाने रंग दाखवायला सुरवात केल्याने खाली उतरावे लागल्याने मनीषाच्या मनाचे समाधान म्हणावे तसे झाले नाही. 

१८ किलो वजन घटले 
माउंट एव्हरेस्ट मोहीम फत्ते करण्यासाठी मनीषा दोन एप्रिलला औरंगाबादेतून रवाना झाली होती. सुमारे दीड महिन्याच्या या मोहिमेसाठी मनीषाने शेवटच्या टप्प्यात वजन वाढविले होते. मोहिमेपूर्वी कमविलेले सर्व वजन मनीषाला गमवावे लागले. मोहिमेपूर्वी ६५ किलो असलेले मनीषाचे वजन ४७ वर आले आहे. हवामानातील असलेल्या गारठ्यामुळे शरीरातील ऊर्जा, अतिरिक्‍त कॅलरी आणि शरीरातील चरबी वापरली जाते. त्यामुळे मनीषाच्या वजनात एवढी घट झाली आहे. 

मनीषा शुक्रवारी शहरात येणार
माउंट एव्हरेस्ट सर करणारी मराठवाड्यातील पहिली महिला ठरलेल्या प्रा. मनीषा वाघमारे हिचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. शनिवारी (ता. २६) ती काठमांडूत दाखल झाली असून, शुक्रवारी (ता. एक) औरंगाबादेत पोचेल. माउंट एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम फत्ते केल्याच्या सुमारे दोन आठवड्यांनी तिचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. लुकला येथे खराब वातावरणामुळे अडकून राहिल्यानंतर मनीषा काठमांडूला पोचली आहे.

Web Title: manisha waghmare mount everest