मनीषा वाघमारे एक पाऊल मागे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

औरंगाबाद - गिर्यारोहक प्रा. मनीषा वाघमारे एव्हरेस्टच्या माथ्यापासून अवघा एक पाऊल दूर असताना निसर्गाने रौद्ररुप धारण केले. सोसाट्याचा वारा आणि बर्फवृष्टीमुळे मनीषाला एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. 

औरंगाबाद - गिर्यारोहक प्रा. मनीषा वाघमारे एव्हरेस्टच्या माथ्यापासून अवघा एक पाऊल दूर असताना निसर्गाने रौद्ररुप धारण केले. सोसाट्याचा वारा आणि बर्फवृष्टीमुळे मनीषाला एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. 

औरंगाबादची गिर्यारोहक आणि इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट असलेल्या मनीषाने हाती घेतलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या मोहिमेची गती निसर्गाने घटवली आहे. एव्हरेस्टच्या चढाईला गुरुवारी (ता.१८) सुरवात केल्यानंतर तिने कॅम्प वनला न थांबता थेट कॅम्प टू गाठले होते. तेथील मुक्काम संपवून तिने कॅम्प थ्री आणि कॅम्प फोरपर्यंत चढाई केली होती. चांगल्या वातावरणाचा अंदाज घेऊन समिट पॉइंटपर्यंत जाण्यासाठी मनीषा आणि तिचा चमू कॅम्प फोरवर सोमवारी (ता.२२) सज्ज होता. पण, वातावरण अचानक बदलले आणि कॅम्प फोरवर सोसाट्याचा वारा वाहू लागला. या बरोबर अलेल्या बर्फवृष्टीमुळे कॅम्प फोरवरील वातावरण बिघडले होते. त्यानंतर साऊथ कोलहून एव्हरेस्टचा माथा गाठण्यासाठीचा धोका न पत्करता मनीषा आणि तिच्या चमूने एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (ता.२३) दुपारी तीनला त्यांनी खाली येण्याच्या प्रवासाला सुरवात केली आणि ती कॅम्प टुच्या दिशेने निघाली. वातावरणाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे इंडियन कॅडेट फोर्सच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

आजारी पडल्याने गिर्यारोहकाचा मृत्यू
समिट पॉइंटपर्यंत गेलेल्या भारतीय गिर्यारोहक रविकुमारचा सोमवारी (ता.२२) मृतदेह आढळून आला होता. आजारी पडल्याने त्याला कॅम्प फोर (२६२४७ फूट) गाठता आले नसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या गाईडचीही प्रकृती खालवली होती. पण, त्याला साऊथ कोलपर्यंत कसेबसे येता आले. आत्तापर्यंत यंदाच्या मोसमात सहा जणांना आपल्या प्रणांना मुकावे लागले आहे.