Maratha Kranti Morcha : वाळूजमध्ये हवेत गोळीबार

Maratha Kranti Morcha : वाळूजमध्ये हवेत गोळीबार

औरंगाबाद, वाळूज - मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहतीसह परिसरात गुरुवारी (ता. नऊ) दुपारनंतर हिंसक वळण लागले. पोलिस व्हॅनसह २५ ते ३० खासगी वाहनांची तोडफोड करून त्यांपैकी काही वाहने पेटविण्यात आली. दरम्यान, १०० ते १२५ कंपन्यांमध्ये तोडफोड करून दोन-तीन कंपन्यांना पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर सौम्य लाठीमार करण्यात आला. जमाव उग्र झाल्याने येथे हवेत सहा राऊंड फायर करण्यात आले असून, अश्रुधुराच्या वीस ते पंचवीस नळकांड्या फोडण्यात आल्या. 

कंपन्यांवर दगडफेक, तोडफोड
स्टरलाईट, जेनरेटर, एफडीसी, वोक्‍हार्ट, इंडोकिंगफिशर, श्रेया, मायलॉन आदी सुमारे वीस छोट्या-मोठ्या कंपन्यांना जमावाने टार्गेट केले होते. यातील काही सुरू तर काही बंद होत्या. जमावाने दगडफेक करून कंपनीचे गेट व इतर साहित्याची नासधूस केली.

पोलिस आयुक्तांच्या ताफ्यावर हल्ला
पोलिस आयुक्तांच्या वाहनांचा ताफा येताच समोरून जमाव आला. त्यांनी ताफ्यावर दगडफेक केली. यात स्कॉटिंगमध्ये कार्यरत जारवाल हे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. वाहनाच्या काचा फुटल्यानंतर त्यांच्या डोळ्याला इजा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. 

आंदोलकांचे जेलभरो
वाळूज भागात सकाळपासून चोख बंदोबस्त होता. आठ ठिकाणी फिक्‍स  पॉइंट लावण्यात आले होते. दरम्यान, जेलभरो आंदोलन करण्यात आले. यात ४०९ जणांना ताब्यात घेऊन रीतसर कार्यवाही करून सोडण्यात आले.

६५ बस परत पाठविल्या
गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास बजाज कंपनीजवळ टायर पेटवून रास्ता रोको केला. पहिल्या शिफ्टसाठी आलेल्या कामगारांच्या बस आंदोलकांनी परत पाठविल्या. रांजणगाव येथे सकाळी आठला फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर साडेपाचपर्यंत ठिय्या मांडला. 

दोन पत्रकारांवर हल्ला
वाळूज औद्योगिक वसाहतीत मायलॉन कंपनीजवळ वार्तांकनासाठी गेलेले सुदाम गायकवाड व श्‍याम गायकवाड या दोन पत्रकारांवर आंदोलकांनी हल्ला केला. यातील सुदाम गायकवाड यांना घाटी रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १४ मध्ये दाखल करण्यात आले आहे. सातारा परिसर येथील राज्य राखीव पोलिस बलातील पोलिस उपनिरीक्षक सतीश चिलवंत हे आंदोलकांच्या दगडफेकीत जखमी झाले. हा प्रकार मोरे चौकात दुपारी दोनच्या सुमारास घडला.

२५ ते ३० वाहनांचे नुकसान
अग्निशमन दलाचे (क्रमांक एमएच- ०४, एच- ८०६९) वाहन स्टरलाईट कंपनीजवळ पेटविण्यात आले. 
बीएसएनएलच्या कार्यालयाजवळ ट्रक पेटविला.
कॅनपॅक कंपनीसमोर पोलिसांची जीप पेटविली.
स्टरलाईट कंपनीलगत ट्रकमधील माल पेटविला.
 खासगी बसवर इंड्युरन्स कंपनीसमोर दगडफेक, ट्रकवर बजाज कंपनीच्या गेटसमोर दगडफेक.

वाळूजमधील स्टरलाईट, वोक्‍हार्ट, मायलॉनसह विविध कंपन्यांना टार्गेट करण्यात आले. येथे तोडफोड झाली असून, सौम्य लाठीमार केला. पोलिस वेळीच पोचले. आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. परिस्थिती शांत असून पोलिस तैनात आहेत.
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com