आता मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून १४ डिसेंबरला नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा क्रांती मूक मोर्चा धडकणार आहे. यशवंत स्टेडियमवरून मोर्चा निघेल. नागपुरातील मोर्चावर राज्य सरकारच्या पवित्र्यानंतर मुंबई मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती रविवारी पत्रकार परिषदेत औरंगाबाद जिल्हा मोर्चाच्या समन्वयकांनी दिली.

मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जिल्हा समन्वयकांची राज्यव्यापी बैठक रविवारी एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात झाली. औरंगाबादला निघालेल्या ९ ऑगस्टच्या मोर्चाला आज दोन महिने पूर्ण झाले. आतापर्यंत २३ जिल्ह्यांत मूक मोर्चे निघाले. त्यात स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या मागण्या निवेदनातून समोर येत होत्या. मोर्चाची दिशा ठरविण्यासाठी औरंगाबादला राज्यव्यापी बैठक पार पडली. यात अकरा ठराव घेण्यात आले, तसेच मराठा तरुणांना दिशा देण्यासाठी आणि आरक्षण, ॲट्रॉसिटी विषयावर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समितीही गठीत करण्यात आली आहे. कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सहा महिन्यांच्या आत आरोपींना फाशी द्यावी, मराठा समाजास तत्काळ आरक्षण मिळावे, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबविण्यासाठी त्यात बदल करावेत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, उद्योग आणि नोकरी यासाठी प्रशिक्षण देणारी स्वायत्त संस्था स्थापन करावी, शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करावी, अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करावे, असे ठराव घेण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
 
आरक्षण, ॲट्रॉसिटीसाठी तज्ज्ञ समिती
आरक्षण आणि ॲट्रॉसिटी विषयावर अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत, निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, निवृत्त न्यायमूर्ती एस. बी. म्हसे, प्रा. सदानंद मोरे, जयसिंगराव पवार, प्राचार्य एम. एम. तांबे, वसंतराव मोरे, निर्मलकुमार देशमुख, राजेंद्र कोंढरे यांचा समावेश आहे.