कोरीगडावरील तोफांसाठी बनताहेत औरंगाबादेत गाडे 

कोरीगडावरील तोफांसाठी बनताहेत औरंगाबादेत गाडे 

औरंगाबाद  - पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतल्या भक्कम कोरीगडावरील चार तोफांसाठी राज्य पुरातत्त्व विभागातर्फे सागवानी गाडे बनविण्यात येत आहेत. औरंगाबादचे निष्णात कारागीर नारायणसिंग आणि दरबारसिंग होलिये यांनी बनविलेल्या या गाड्यांवर कोरीगडावरील तोफा लवकरच विराजमान होणार आहेत. 

अखंड तटबंदी आणि लढाऊ तोफांमुळे बलाढ्य असलेला कोरीगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला. त्याच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे, अशी सूचना गड संवर्धन समितीने एप्रिल 2016 मध्ये राज्य पुरातत्त्व विभागाला केली होती. त्यानुसार सध्या किल्ल्यावर काम सुरू आहे. गणेश दरवाजा, कोराईदेवीचे मंदिर, दीपमाळ, अखंड तटबंदी आणि अनेक बुरुज अशा अवशेषांबरोबरच युरोपीय बनावटीच्या सहा तोफा सध्या किल्ल्यावर आहेत. त्यापैकी चार तोफांना सागवानी गाडे बसवण्यात येणार आहेत. 

नव्वदीतील निष्णात कारागीर नारायणसिंग होलिये यांच्या देखरेखीत त्यांचे पुत्र दरबारसिंग आणि सहकारी औरंगाबादेत हे काम करत आहेत. भक्कम सागवानी लाकडातून घडविलेल्या या गाड्यांना लोखंडी धाव चढवलेली चार चार चाके आहेत. युरोपीय बनावटीच्या तोफांना ओतीव लोखंडाचे गाडे बनवले जात. तेच मूळ डिझाइन यात वापरले गेले आहे. 

मोठ्या तोफांना बैलगाडीच्या चाकांसारखे गाडे बनवले जातात; मात्र बुरजाच्या आडून शत्रूच्या नजरेस न पडता गोळा डागणाऱ्या या तोफांसाठी बसके लहान गाडे असत. तसेच तोफा बुरजांवर उघड्यावर ठेवल्या जाणार असल्याने पाऊस वाऱ्याचा परिणाम होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. 
- दरबारसिंग होलिये, कारागीर 

कोरीगडची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी 
शिवरायांनी 1657 मध्ये कोरीगड स्वराज्यात घेतला होता. पुढे पंत सचिवांनी 1700 मध्ये हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. इंग्रज अधिकारी कर्नल प्रॉथरने 11 मार्च 1818 ला किल्ल्यावर चढाई केली; पण किल्ला ताब्यात येत नसल्याने तोही वैतागला होता; मात्र 14 मार्च 1818 ला किल्ल्यावरील दारूकोठारावर एक तोफेचा गोळा पडला. अनेक मावळे धारातीर्थी पडले. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. येत्या 14 मार्चला या घटनेला 200 वर्षे पूर्ण होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com