Bacchu-Kadu
Bacchu-Kadu

दानवेंच्या विरोधात लोकसभा लढवणार - बच्चू कडू

औरंगाबाद - ‘एवढी तूर खरेदी करूनही रडतात साले’ असे म्हणत राज्यातील समस्त शेतकऱ्यांचा अपमान करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जालना मतदारसंघातून मी निवडणूक लढविण्याचा विचार करीत असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करीत असल्याचेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. 

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना दानवे यांनी दिलेली शिवी शेतकरी विसरलेला नाही. त्यांच्याविषयी शेतकऱ्यांत अजूनही प्रचंड रोष आहे. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत दानवेंचा पराभव करा आणि शेतकऱ्यांच्या अपमानाचा बदला घ्या, असा आग्रह शेतकरी व कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यावर मी नक्कीच विचार करीत असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. 

१९ फेब्रुवारी रोजी सेलू येथे भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आमदार बच्चू कडू आले होते. या वेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. बच्चू कडू हे विदर्भातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांचे काम संपूर्ण राज्यात सुरू आहे. शेतीमालाला हमीभाव, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कापूस खरेदी, तूर खेरदीसह शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील प्रश्‍नांवर बच्चू कडू नेहमीच सभागृहात आक्रमकपणे बाजू मांडतात. प्रहार संघटनेच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे प्रश्‍नदेखील त्यांनी धसास लावल्याची कार्यकर्ते व शेतकऱ्यांची भावना आहे.

‘साले’ विषयाशिवाय पैठणजवळ हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारावरदेखील श्री. दानवे यांचे ‘गोळ्या छातीवर नाही, तर पायावर घालायला हव्या’’असे वादग्रस्त विधान गाजले होते. याची आठवण शेतकरी व कार्यकर्त्यांनी सेलूच्या बैठकीत बच्चू कडू यांना करून दिली. या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी, तसेच श्री. दानवे यांची मतदारसंघातील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी गळ त्यांना कार्यकर्त्यांनी घातली आहे.

बच्चू कडू यांना सर्व पक्षांकडून ऑफर येत असल्याचेदेखील बोलले जाते. परभणी, वर्धा आणि जालना या तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा, अशी मागणी त्या त्या भागातील कार्यकर्ते व शेतकरी बच्चू कडू यांच्याकडे करीत आहेत असे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com