शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमले

औरंगाबाद - क्रांती चौकात शिवगीतांवर ठेका धरलेले शिवप्रेमी.
औरंगाबाद - क्रांती चौकात शिवगीतांवर ठेका धरलेले शिवप्रेमी.

औरंगाबाद - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (ता. १९) अमाप शिवभक्‍तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता संस्थान गणपती येथून ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मुख्य मिरवणुकीतील शेतकरी आत्महत्या, सर्वधर्म समभाव अशा सजीव देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले होते. यामुळे शहर भगवेमय झाल्याचे दिसून आले.

संस्थान गणपती येथे विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीस सुरवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाषणे केली. यानंतर शहागंज, सिटी चौक, गुलमंडी, पैठण गेटमार्गे क्रांती चौक येथे मिरवणुकीचे विसर्जन झाले. मिरवणुकीत सर्वात पुढे वाहनरथात शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवला होता. त्यामागे घोडे, त्यावर स्वार झालेले मावळे यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली. तसेच एका घोड्यावर पूजा प्रधान हिने जिजाऊ, सर्वज्ञ संदीप शेळके या चिमुकल्याने बाल शिवाजी, तर संतोष पगारे यांनी शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यात शहरातील विविध भागांतून निघालेल्या मिरवणुका सहभागी झाल्या होत्या. भगवे फेटे बांधून शिवप्रेमींनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. पारंपरिक वेशभूषेतील महिला डोक्‍यावर तुळस, कलश घेत मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.

जत्थेच्या जत्थे दिवसभर क्रांती चौकाच्या दिशेने येत होते. येणाऱ्या शिवभक्‍तांचे स्वागत करण्यासाठी सिटी चौक येथे पोलिस आयुक्‍तालय, गुलमंडी येथे स्वराज्य प्रतिष्ठान, तसेच प्रमोद नरवडे यांच्यातर्फे पैठण गेट, नूतन कॉलनी येथे व्यासपीठ उभारण्यात आले होते. मिरवणुकीत पोलिस आयुक्त यशस्वी यादव, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार कल्याण काळे, शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, कार्याध्यक्ष अनिल मानकापे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, मनोज पाटील, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, रशीद मामू, डॉ. भागवत कराड, प्रकाश मुगदिया, राजू शिंदे, अभिजित देशमुख, मानसिंग पवार, इब्राहीम पठाण, चंद्रकांत ठोंबरे, जितेंद्र देहाडे, विनोद बनकर, संदीप शेळके, रमेश गायकवाड, तनसुख झांबड, राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात, जगन्नाथ काळे आदी सहभागी होते.

बाल शिवाजी ठरले आकर्षण
बाल शिवरायांची वेशभूषा केलेल्या सर्वज्ञ संदीप शेळके आणि माँ जिजाऊ यांच्या वेशभूषेतील पूजा प्रधान यांनी जयंती मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा केलेले तरुणही मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

क्षणचित्रे
रविवारी मध्यरात्रीच क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह महिलांनी रात्रीच शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गर्दी करीत घोषणाबाजी केली.
प्रथमच मुलींचा सहभाग असलेल्या ढोल-ताशांनी लक्ष वेधले.
मुलींनी फेटे बांधून काढलेली दुचाकी रॅली आकर्षण ठरली.
शहरात रिक्षांवरील भगव्या, निळ्या झेंड्यांच्या माध्यमातूनही एकतेचा संदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com