पैसे दिले तरच प्रसूती, नाही तर जा ‘घाटी’त

doctor
doctor

खुलताबाद - रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा हे ब्रीद बाळगणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाने प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचा आर्थिक पिळवणुकीचा नवा फंडा गेल्या महिन्यापासून सुरू केला आहे. पैसे दिले तरच प्रसूती अन्यथा रेफर टू घाटी हे धोरण सुरू असल्याने ग्रामीण महिलांची अन्‌ त्यांच्या कुटुंबीयांची ससेहोलपट सुरू आहे. याबाबत तालुक्‍यातील भडजी येथील कुटुंबाने रीतसर लेखी तक्रार मंगळवारी (ता. २०) वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय यांच्याकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

स्वाती आकाश बारहाते रा. रायपूर (ता. गंगापूर) यांचे माहेर भडजी (ता. खुलताबाद) येथे माहेर आहे. त्या प्रसूतीसाठी सोमवारी (ता.१९) पहाटे पाचच्या सुमारास आई, वडिलांसमवेत खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात आल्या. या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिका आर. व्ही. गवई यांनी कागदपत्रांची भीती दाखवीत प्रसूती इथे करता येणार नाही म्हणून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. 

तरीही सदर महिला व तिच्या आई- वडिलांनी विनवणी केल्याने तिला दाखल करून सलाईन लावण्यात आले व चक्क तीन हजारांची मागणी केली. पैसे देत नसल्याचे पाहून सलाईन काढून फेकले. सदर महिलेच्या आई-वडिलांनी विनवणी करीत तडजोड दोन हजारांत झाली. पैकी चौदाशे रुपये आधी देण्यात आले, अन्‌ उर्वरित रक्कम नंतर देण्याबाबत दम भरला. दुसऱ्या दिवशी ते पैसे दिले नाहीत म्हणून मानसिक छळ सुरू केला. या प्रकरणी सदर महिलेचे वडील संजय व आई गयाबाई वाकळे, रा. भडजी यांनी मंगळवारी (ता.२०) वैद्यकीय अधीक्षक यांना रीतसर लेखी तक्रार दिली. त्यात वरील सर्ब बाबी नमूद केल्या आहेत. या ठिकाणी सुरू असलेली आर्थिक लूट थांबविण्याची मागणी यात केली आहे.

असून अडचण, नसून खोळंबा
खुलताबाद ग्रामीण रुग्णालयाची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अवस्था बनली आहे. या ठिकाणचे वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, मिश्रक, परिचारिका यांच्यासाठी निवासस्थाने असतानादेखील ते औरंगाबादहून ये-जा करीत असल्याने रात्रीच्या वेळी रुग्णांना सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com