रिपब्लिकन ऐक्‍यविरोधी नेत्यांना जिल्हाबंदी करा : रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

अकोला : रिपब्लिकन ऐक्‍याची ताकद मोठी असून, त्यासाठी सुरवातीपासूनच आग्रही आहोत. परंतु काही नेत्यांमुळे ऐक्‍याची मोट बांधण्यास अडचणी येत आहेत. अशा नेत्यांना रिपब्लिकन जनतेने जिल्हाबंदी करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. 

अकोला : रिपब्लिकन ऐक्‍याची ताकद मोठी असून, त्यासाठी सुरवातीपासूनच आग्रही आहोत. परंतु काही नेत्यांमुळे ऐक्‍याची मोट बांधण्यास अडचणी येत आहेत. अशा नेत्यांना रिपब्लिकन जनतेने जिल्हाबंदी करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) आज जिल्ह्यात आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमासाठी आठवले अकोल्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "मी आहे ऐक्‍यासाठी वेडा...मी आहे ऐक्‍यासाठी वेडा...आणि तुम्ही म्हणता त्यांनीच घातला यामध्ये खोडा...' असा खास काव्यात्मक शैलीत आठवले यांनी डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता टोला लगावला. 

ऐक्‍यासाठी आपण सुरवातीपासूनच आग्रही आहोत. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही काम करायला तयार आहोत. पण काही नेत्यांची ऐक्‍य व्हावे अशी इच्छाच नाही. ते नेते कोण याची सर्वांनाच माहिती आहे. दलित समाजाने अशा नेत्यांना जिल्हाबंदी करावी, असे आठवले म्हणाले. 

गुजरातमध्ये काँग्रेसकडून मोठमोठ्या उड्या मारण्यात येत आहेत. मात्र सर्वांत मोठी उडी नरेंद्र मोदींची राहील हे त्यांनी विसरू नये. गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे. राहुल गांधी हे सध्या चांगले काम करत आहेत. ते अधून-मधून दलितांच्या घरी जाऊन जेवतात, बसतात त्यांना आपले म्हणतात. त्यांना दलित समाजाबद्दल येवढाच आपलेपणा वाटतो, तर त्यांनी दलित मुलीशी लग्न करून देशासमोर आदर्श दाखविणे आवश्‍यक असल्याचे आठवले म्हणाले. 

वेगळ्या विदर्भाला आमचा पाठिंबा असून, डिसेंबरमध्ये त्यासाठी मोठे आंदोलन करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. 

ऐक्‍यात पवारांची महत्त्वाची भूमिका 
जेव्हा राज्यात रिपब्लिकन ऐक्‍य झाले होते त्या वेळी दलितांची ताकद दिसली होती. ऐक्‍यात सीताराम केसरी यांची भूमिका महत्त्वाची होती व शरद पवारांची भूमिका शून्य होती, असे डॉ. प्रकाश आंबेडकरांनी म्हणणे चुकीचे आहे. मी दलित पॅंथर बरखास्त केली नसती, तर ऐक्‍य झाले नसते. पण मला त्या गोष्टीचे श्रेय घ्यायचे नाही. काही नेते ऐक्‍यातून बाहेर पडल्याने समाजाचे फार मोठे नुकसान झाले असून, ते आजही होत आहे, असे आठवले म्हणाले.