हॉटेल, खासगी शिकवणी हॉस्पिटल कराच्या कचाट्यात

Osmanabad-Nagarparishad
Osmanabad-Nagarparishad

उस्मानाबाद - हॉस्पिटल, हॉटेल, खासगी शिकवणी पालिकेच्या कराच्या कचाट्यात आले असून, बुधवारी (ता. २१) पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ८४ लाख १४ हजार १९ रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांवर मात्र कोणताही कराचा बोजा वाढविण्यात आलेला नाही. दरम्यान, मालमत्ता कराचा भरणा करताना चुकीच्या पद्धतीने नागरिकांना नोटीस देत अर्थसंकल्पातील आकडे फुगविण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी या वेळी केला.

बुधवारी पालिकेत आयोजित विशेष सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष सूरज साळुंके, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी एक वाजता सभेला सुरवात होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक खलिफा कुरेशी यांनी कत्तलखान्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली; तसेच १८ वर्षांपूर्वी कत्तलखान्यासाठी दानपत्र केलेल्या जागेवर कत्तलखाना बांधावा अन्यथा जागा परत देण्याची मागणी त्यांनी केली. दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगत जागेसह कत्तलखान्याचे आरक्षण ठेवण्यासाठी लेखी मागणी नोंदविण्याची सूचना नगराध्यक्षांनी केली. दरम्यान, आकड्यातील चुकांवरून राष्ट्रवादीचे गटनेते युवराज नळे यांनी प्रशासनाला जाब विचारला. तांत्रिका चुका असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगताच यावर पडदा पडला. तर समता कॉलनीतील प्रभागात आणि शहरातील काही प्रमुख कामांना आर्थिक तरतूद करण्याची मागणीही या वेळी नळे यांनी केली. दरम्यान, पालिकेचे एकूण महसुली जमा ६० कोटी ९६ लाख ६४ हजार १९ रुपये असल्याचे सांगितले. तर एकूण महसुली खर्च ६० कोटी १२ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगत ८४ लाख १४ हजार १९ रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पाला या वेळी मंजुरी देण्यात आली.

२५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित
शहरातील बाह्यरुग्ण विभागाच्या दवाखान्यांना प्रतिवर्ष पाच हजार रुपये, तर मोठ्या दवाखान्यांना प्रतिबेड प्रतिवर्ष ७५० रुपयांचा कर द्यावा लागणार आहे. छोट्या हॉटेलला तीन हजार रुपये (प्रतिवर्ष), तर मोठ्या हॉटेलला सात हजार पाचशे रुपये, बिअरशॉपी व लॉज यांनाही प्रतिवर्ष पाच हजार रुपयांचा कर द्यावा लागणार आहे. शिकवणी घेणाऱ्या खासगी क्‍लासेसधारकांनाही पाच हजार रुपयांचा कर भरावा लागणार आहे. अशा करातून पालिकेला वर्षाला किमान २५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. 

नाट्यगृह दुरुस्तीसाठी तरतूद
कत्तलखान्यासाठी दोन कोटी, वीजबिल १० कोटी, विद्युत देखभाल-दुरुस्ती दोन कोटी, नाट्यगृह दुरुस्ती तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पातील आकडे जरी मोठे वाटत असले, तरी प्रत्यक्षात काही योजना मंजूर झाल्यानंतर नव्याने अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची गरज पडणार नाही. येणाऱ्या काळातील योजना लक्षात घेत अर्थसंकल्प तयार केला आहे. शहराच्या विकासाला यातून निश्‍चित चालना मिळेल. 
- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष.

आकडे फुगवून अर्थसंकल्प तयार केला आहे. नागरिकांना चुकीच्या पद्धतीने नोटीस देण्यात आल्या आहेत. वेळेच्या पूर्वीच मालमत्ता कर भरावा, अन्यथा दंडव्याज ही पद्धत चुकीची आहे. 
- ॲड. युवराज नळे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com