केंद्र, राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. बेरोजगारीचे प्रमाणही वाढत आहेत. कापूस, हळद, ऊस, सोयाबीन या पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे देश व राज्यातील कुठल्याही क्षेत्रातील नागरिक समाधानी नाही. देशातील ओबीसी, दलित व सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदावा, ही फुल-शाहू- आंबेडकर यांची इच्छा होती. छत्रपती शिवाजी महारांजाचीही तिच इच्छा होती. परंतु त्यालाच गालबोट लावण्याचे मनुवादी प्रयत्न सध्या सुरू आहेत.

तुळजापूर : केंद्र व राज्य सरकारकडून जनतेला फसवले जात आहे. जनता भरडली आहे. जनतेच्या बाबतीत कुठलाही योग्य निर्णय घेतला जात नाही. यांच्या राज्यात शेतकरी, दलितासह कुठल्याही क्षेत्रातील नागरिक समाधानी नाही. शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही. सर्वच बाबतीत केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाडा विभागात काढण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा प्रारंभ मंगळवारी (ता. १६) तुळजापूर येथून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, 
आमदार राणाजगजितसिंह पाटील, राहुल मोटे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील, नगराध्यक्ष अर्चना गंगणे, पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी अशोक जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार म्हणाले की, राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. बेरोजगारीचे प्रमाणही वाढत आहेत. कापूस, हळद, ऊस, सोयाबीन या पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे देश व राज्यातील कुठल्याही क्षेत्रातील नागरिक समाधानी नाही. देशातील ओबीसी, दलित व सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदावा, ही फुल-शाहू- आंबेडकर यांची इच्छा होती. छत्रपती शिवाजी महारांजाचीही तिच इच्छा होती. परंतु त्यालाच गालबोट लावण्याचे मनुवादी प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्याला आवर घालण्यासाठी सर्वांनी तयार राहिले पाहिजे. सर्वधर्मीय समाधानाने कसा जगेल, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. जनतेला फसवले जात आहे, त्याबाबत त्यांच्या काय पार्श्वभूमी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस करती आहे. यासाठी आपण सर्वांचे सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेसला हवे आहे.

प्रारंभी सर्व नेत्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर जागरण गोंधळ घालण्यात आला. या  कार्यक्रमानंतर मोर्चाने जाऊन तहसील कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Marathi news Tuljapur news Ajit Pawar criticize government