मराठवाड्यात प्रथमच हृदय प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - औरंगाबादमधील अवयवदान चळवळीला वर्ष पूर्ण होत असतानाच हृदयाची गरज असलेल्या एका शेतकऱ्यावर बुधवारी सकाळी मेंदूचे कार्य थांबलेल्या शिक्षकाचे हृदय बसविण्यात आले. गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणात पुढे जावे यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या या शिक्षकाच्या अवयवदानातून चौघांना जीवदान मिळाले आहे. मराठवाड्यात पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली. अशी सुविधा उपलब्ध असणारे औरंगाबाद हे राज्यातील तिसरे केंद्र ठरले आहे.

औरंगाबाद -नगर रस्त्यावरील कायगाव (ता. गंगापूर) येथील साहेबराव पाटील डोणगावकर हायस्कूलमध्ये गणित विषयाचे शिक्षक अनिल पंडित पाटील हे मोटारसायकल अपघातात रविवारी (ता. 29) सायंकाळी जखमी झाले. त्यानंतर त्यांना युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या मेंदूचे कार्य थांबले असल्याचे निष्पन्न झाले. त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या धैर्याने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार आवश्‍यक त्या बाबींची पूर्तता करून प्रतीक्षायादीनुसार नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यास हे हृदय देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

महागडा विमान प्रवास टळला
काही दिवसांपूर्वीच सिग्माला हृदय प्रत्यारोपण करण्यास मंजुरी मिळाली. त्यामुळे आतापर्यंत हृदयाचा विमानातून होणारा महागडा प्रवास टळला. आज सकाळपासूनच सिग्मा हॉस्पिटलमध्ये अवयवदानाच्या कामास सुरवात झाली. सर्वप्रथम पावणेदहाच्या सुमारास यकृत काढून ते पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर एक मूत्रपिंड शहरातील कमलनयन बजाज हॉस्पिटलला, तर दुसरे माणिक हॉस्पिटलला पाठविण्यात आले. चारही जणांवर अवयव प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचे "सिग्मा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे यांनी सांगितले.

तेरा महिन्यांत 33 जणांना जीवदान
अवघ्या साडेबारा महिन्यांच्या कालावधीत दहा जणांच्या अवयवदानातून तब्बल 33 जणांना जीवदान देण्याचे काम औरंगाबादमधून झाले. यातील बहुतांश अवयव प्रत्यारोपण हे मुंबई, पुणे तसेच चेन्नई येथे झाले. यामध्ये 20 जणांना मूत्रपिंड, सहा जणांना हृदय, तर 7 जणांना यकृत अशा अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले.

Web Title: Marathwada first heart transplant