तुळजापुरजवळ दोन अपघातात पाच ठार

जगदीश कुलकर्णी
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

तुळजापूरहून सोलापूरला निघालेला सहा आसनी रिक्षा (एमएच १३ जी- ९६०९) शहरापासून एक किलोमीटरवर घाटामध्ये उलटला. या अपघातात तीनजण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले. अपघातातील मृत व जखमी हे सोलापूर येथील आहेत. या अपघातात दीपक गोवर्धन पुठ्ठा (वय २१), व्यंकटेश रमेश आर्टला (वय २१), योगेश राजू महेंद्रकर (वय १९, तिघेही रा. एस पॉईंट घरकुल, सोलापूर) हे ठार झाले

तुळजापूर(जि. उस्मानाबाद) - तुळजापूर- सोलापूर महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झाले तर २५ जण जखमी झाले. आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास हे अपघात झाले.

तुळजापूरहून सोलापूरला निघालेला सहा आसनी रिक्षा (एमएच १३ जी- ९६०९) शहरापासून एक किलोमीटरवर घाटामध्ये उलटला. या अपघातात तीनजण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले. अपघातातील मृत व जखमी हे सोलापूर येथील आहेत. या अपघातात दीपक गोवर्धन पुठ्ठा (वय २१), व्यंकटेश रमेश आर्टला (वय २१), योगेश राजू महेंद्रकर (वय १९, तिघेही रा. एस पॉईंट घरकुल, सोलापूर) हे ठार झाले.

दुसरा अपघात तुळजापूर- सोलापूर मार्गावरील सांगवी (मार्डी) जवळ गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास झाला. बामजीचावाडी (ता. उदगीर, जि. लातूर) येथील वऱ्हाडी मंडळी नातेपुतेकडे (जि. सोलापूर) टेम्पोमधून (एमएच २४ एबी ५६५५) लग्नासाठी निघाले होते. सांगवी (मार्डी, ता. तुळजापूर) जवळ हा टेम्पो उलटला. या अपघातात नरसिंग मल्हारी मुगळे (वय ७०) व वैष्णवी अभंग चोपडे (वय १३, दोघेही रा. बामाजीचावाडी) हे दोघे ठार झाले तर १९ जण जखमी झाले. अपघातातील २५ पैकी १३ जणांवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित १३ जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे.

Web Title: marathwada news: accident