अनोख्या शैलीने ‘बुद्ध’ हसविणारा कलाकार हरपला

अनोख्या शैलीने ‘बुद्ध’ हसविणारा कलाकार हरपला

लातूर - मी खूप चिंतन करून चितारत नाही, तत्त्वान्वेषपण करण्याचा प्रयत्नही करीत नाही, काही तरी अगम्य शक्ती माझ्या अंतर्मनातील भावभावनांना साद घालते अन्‌ माझ्या कुंचल्यातून कलाविष्कार घडतो. हेच चित्र प्रत्येकवेळी पुन्हा पाहताना माझ्या मनावर वेगळाच परिणाम घडवितो, असं सहज म्हणणाऱ्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वेगळ्या आणि अनोख्या शैलीने ‘बुद्ध’ हसविणाऱ्या आणि लाखो रुपये किमतीने एकेक चित्र विकले जाणाऱ्या चित्रकाराचा करुण अंत झाला. 

चित्रविश्‍वातील उत्तुग उंचीच्या चित्रकाराचे सोमवारी (ता. तीन) सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शहरातील मारवाडी स्मशानभूमीत झालेल्या अंत्यविधीला अगदी बोटावर मोजावेत एवढ्याच लोकांनी उपस्थिती लावली. 

१ जानेवारी १९६९ ला जन्मलेल्या दत्ता बनसोडे यांनी कला शिक्षण पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालय आणि मुंबईच्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून पूर्ण केले. मुंबईतच राहून प्राध्यापकी करीत आपल्या कलेतून चित्ररसिकांमध्ये आपली ओळख निर्माण केली. त्यांच्यावर थोर चित्रकार प्रभाकर बर्वे, तुका जाधव यांच्या चित्रशैलीचा मोठा प्रभाव असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. १९९२ मध्ये भरविलेल्या त्यांच्या पहिल्याच चित्रप्रदर्शनातील कलेने तय्यब मेहता, सुनील दास यांच्यासारख्या प्रसिद्ध चित्रकारांचे लक्ष वेधले; मात्र त्यांची ओळख जगभर झाली ती खऱ्या अर्थाने १९९८ नंतर. त्या वेळी पोखरणमध्ये भारताने अणुचाचणी घेतली होती, त्याला...आणि बुद्ध हसला, असं सांकेतिक नामाभिधान दिलं होतं. बुद्धांचं खरं तत्त्वज्ञान जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर अनुभवलेल्या दत्ता यांनी चित्रांची ‘बुद्ध मालिका’ सुरू केली. वेरूळ-अंजिठा लेणीमध्ये चित्तारलेल्या बुद्धांच्या प्रतिमेनंतर अनोख्या आणि वेगळ्या ब्लॅक अँड व्हाईट शैलीत बुद्ध प्रतिमा प्रथमच त्यांनी चितारली. त्यांच्या या चित्रांनी जगाचं लक्ष वेधलं. इंडोनेशिया, अमेरिका, सिंगापूर अशा अनेक देशांमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले; मात्र त्यांनी अचानक लातूरला परतण्याचा निर्णय घेतला आणि एका आंतरराष्ट्रीय चित्रकाराचे जीवन कारुण्याने डबडबले. त्यांची ओळख माहीत असलेला प्रत्येकजण त्यांच्या जीवनाकडे पाहून हळहळायचा. अशा कारुण्याने जीवन जगलेल्या एका कलाकाराचा अंत एकाकी झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com