वाहनांच्या "बंपर ऑफर'वर मराठवाड्यामध्ये झुंबड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

औरंगाबाद - "बीएस-3' इंजिन असलेल्या वाहनांवर आलेली बंदी, कंपन्यांनी जाहीर केलेल्या घसघशीत सवलतींमुळे मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही गुरुवारी (ता. 31) ग्राहकांची झुंबड उडाली. चौकशी, नोंदणी आणि वाहन ताब्यात घेण्यासाठी पाडव्यानंतरचा उत्साह पुन्हा पाहायला मिळाला. अनेक जण दुचाकी आणि चारचाकींचे 24 तासांत मालक बनले. अनेक शोरूमधारकांना "नो स्टॉक'चा फलक झळकवावा लागला. 

कंपन्यांनी बुधवारी (ता. 30) सवलत जाहीर केली आणि अंतिम मुदत साठा असेपर्यंत तसेच 31 मार्चपर्यंत ठेवली. त्यामुळे काल दुपारनंतर ग्राहकांची पावले शोरूमकडे वळली. काल ज्यांना जमले नाही त्यांनी आज तोबा गर्दी केली. बहुतांश शोरूममधील दुचाकींचा साठा संपल्याने "नो स्टॉक'चे फलक झळकले. त्यामुळे गर्दीतील अनेकांना सवलतीचा लाभ मिळाला नाही. 

औरंगाबाद शहरात 24 तासांत तीन हजार सातशे ते चार हजार दोनशे दुचाकी, 650 ते 840 तीनचाकी, 750 ते 950 चारचाकी वाहनांची नोंदणी-विक्री झाली. यात कमर्शियल वाहनांना प्राधान्य होते. बीडमध्ये हिरो कंपनीच्या 150 तर होंडा कंपनीच्या 200 दुचाकी विकल्या गेल्या. दोन्ही कंपन्यांच्या दुचाकींचा स्टॉक संपल्याने अनेक इच्छुकांना माघारी फिरावे लागले. उस्मानाबादमध्येही अशीच स्थिती होती. सुमारे आठशे दुचाकींची विक्री झाली. लातूरमध्ये दोन दिवसांत एक हजार दुचाकी तर 68 चारचाकी वाहनांची नोंदणी-विक्री झाली. नांदेडमध्ये काही दुचाकी विक्रीच्या शोरूमसमोरील गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. हिंगोली शहरातील संबंधित एजन्सीवर दुचाकी खरेदीसाठी दिवसभर अक्षरशः ग्राहकांची जत्रा भरली होती. ग्रामीण, शहरी भागातील ग्राहकांनी मिळेल ती दुचाकी खरेदी केली. परभणी शहरातही कालच गर्दी झाली होती. आजही तसे चित्र होते मात्र बहुतांश गाड्यांची विक्री झाली होती. जालन्यात स्टॉकच नसल्याचे सांगण्यात येत होते.