मराठवाड्यातील जिल्हा क्रीडा केंद्रांसाठी आले एकोणतीस लाख 

आदित्य वाघमारे - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 2 जानेवारी 2017

औरंगाबाद - राज्यभरातील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांसाठी राज्य सरकारने पाच कोटींच्या निधीची मोठी तरतूद केली आहे. एक कोटी 95 लाख 55 हजार शंभर रुपयांच्या निधी वितरणला सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, त्यातील 29 लाख तीस हजारांचा निधी मराठवाड्याच्या पदरात पडला आहे. 

औरंगाबाद - राज्यभरातील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांसाठी राज्य सरकारने पाच कोटींच्या निधीची मोठी तरतूद केली आहे. एक कोटी 95 लाख 55 हजार शंभर रुपयांच्या निधी वितरणला सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, त्यातील 29 लाख तीस हजारांचा निधी मराठवाड्याच्या पदरात पडला आहे. 

राज्यातील खेळाडूंना आणि खेळाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून जिल्ह्यांच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या क्रीडा केंद्रांना देण्यात येणारा मदतीचा पहिला हप्ता शासनाने मोकळा केला आहे. एकूण पाच कोटींची तरतूद असलेल्या या निधीतील एक कोटी 95 लाख 55 हजार शंभर रुपयांच्या निधी वितरणला मान्यता देण्यात आली. त्या अंतर्गत मराठवाड्यातील केंद्रांसाठी 29 लाख तील हजारांचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या यादीत मराठवाड्याच्या हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यंदा या अंतर्गत जिल्ह्यांना भरघोस निधी देण्यात आला असला तरी औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यांना या पासून वंचित राहावे लागणार आहे. मराठवाड्यातील जिल्हा कार्यालयांना या निधीच्या माध्यमातून नवे खेळाडू घडविण्यासाठी मदत उपलब्ध झाली आहे. 

विद्यमान केंद्रांचे ऑडिट केव्हा होणार? 
जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा कार्यालयात कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून चालणाऱ्या या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात सराव करणाऱ्या खेळाडूंपर्यंत हा निधी पोहोचविण्याचा हेतू असतो. तसे न होता विधायक कामावर हा खर्च न करत ही रक्कम अनावश्‍यक ठिकाणी किंवा "सादिल खर्च' या हेडखाली "वर्ग' केली जाते. लाखो रुपयांचा प्रतिवर्षी येणाऱ्या या निधीचा वापर नेमका कसा झाला, त्याचा फायदा तळागाळातील खेळाडूंना खरेच झाला का? याचे ऑडिट करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. 

विदर्भाच्या हाती लागले साडेअठ्ठावण्ण लाख 
एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी वितरणात राज्य क्रीडा मंत्रालय विदर्भावर अधिक मेहरबान असल्याचे पुन्हा एकदा दिसले. यातील तब्बल 58 लाख बासष्ट हजारांचा निधी विदर्भाच्या हाती लागला आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांना हा निधी प्रदान करण्यात येणार आहे. 

जिल्हानिहाय निधी (लाखात) 
औरंगाबाद विभाग 
हिंगोली - 6,73,500 
बीड - 8,23,500 
लातूर विभाग 
नांदेड - 11,65,500 
लातूर - 11,02,000 
उस्मानाबाद - 11,65,000 

नागपूर विभाग 
नागपूर - 10,39,000 
गोंदिया - 7,40,500 
चंद्रपूर - 11,11,500 
भंडारा - 9,35,100 
गडचिरोली - 10,87, 000 
अमरावती - 9,49,500 (स्वतंत्र विभाग)