मराठवाडा, विदर्भाच्या घशाला कोरड!

मराठवाडा, विदर्भाच्या घशाला कोरड!

राज्यात टंचाईच्या झळा - कडक उन्हामुळे जलसाठ्यांचे झपाट्याने बाष्पीभवन
औरंगाबाद - उन्हाचा कडाका वाढत असतानाच दुष्काळवाडा ठरलेल्या मराठवाड्यासह विदर्भ टंचाईच्या छायेत आहे. अनेक गावांत टॅंकर सुरू झाले आहेत. अपवाद वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत टॅंकरने पाणी पुरविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जलयुक्त शिवार योजनेचा काही गावांना फायदा झालेला दिसतो.

सध्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 157 गावांची तहान 176 टॅंकर भागवत आहेत. 164 गावांसाठी 180 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. औरंगाबादमधील सर्वाधिक 141 गावांत 157 टॅंकर सुरू आहेत. बीडमध्ये 125 टक्‍के पावसामुळे बहुतांश प्रकल्प तुडुंब भरले. परिणामी, यंदा सहाच टॅंकर सुरू आहेत. गेल्या वर्षी तब्बल 950 टॅंकर धावत होते.

माजलगाव धरणात 49.68; तर "मांजरा'त 45 टक्के साठा आहे. 144 प्रकल्पांत जवळपास 40 टक्के पाणी आहे. टॅंकरमंजुरीसाठी 34 अटी असल्याने ग्रामपंचायतींची दमछाक होत आहे. जालना जिल्ह्यातील 64 प्रकल्पांत 28 टक्के साठा असून, सध्या 12 टॅंकर सुरू आहेत. परभणी, हिंगोली, नांदेड सध्यातरी टॅंकरमुक्त दिसतात.

विदर्भात भूजलपातळी खालावली
यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूरला टंचाईच्या झळा जाणवताहेत. नागपूरलगतच्या बेसा परिसरात हजार फूट खोल हातपंपालाही पाणी नाही. नागपूर विभागातील लहानमोठ्या 397 प्रकल्पांत सरासरी 25 टक्के साठा आहे. यंदा अमरावती विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये 37.72 टक्के, पाच मध्यम प्रकल्पात 38.57 टक्के, पाच लघुप्रकल्पांत 28 टक्के साठा आहे.

सोलापूरला तापमानवाढीचा फटका
सोलापूर - जिल्ह्यातील 53 पैकी 29 तलाव पूर्णपणे आटले आहेत. उर्वरित 24 तलावांमध्ये 14.95 टक्के उपयुक्त साठा आहे. पूर्ण क्षमतेने भरलेल्या उजनी धरणात आता साठा 15 टक्के आहे. सोलापूरमध्ये या हंगामात सर्वाधिक 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

धुळ्यात पाण्यासाठी वणवण
धुळे जिल्ह्याला टंचाईच्या सर्वाधिक झळा जाणवताहेत. जळगावच्या काही भागांत टॅंकरची मागणी आहे. नाशिक जिल्ह्यातील 74 गावे आणि 127 वाड्यांसाठी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 70 टॅंकर सुरू होते. यंदा 11 गावांतच टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील 24 धरणांत 33 टक्के साठा आहे.

सह्याद्रीच्या रांगांत टॅंकरचे प्रस्ताव
कोल्हापूर - जिल्ह्यातील 100 गावे टंचाईग्रस्त असली तरी सध्या कोठेही टॅंकर धावत नाहीत. जिल्हा परिषदेने दोन कोटींचा टंचाई आराखडा बनवला आहे. सांगलीमधील 55 गावांना टॅंकरने पाणी मिळते. टॅंकरमुक्त सिंधुदुर्गातही टंचाईची झळ बसत आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दोडामार्ग, सावंतवाडी, कणकवली आणि वैभववाडीतून टंचाईनिवारणाचे 25 प्रस्ताव आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 11 गावे आणि 16 वाड्या टंचाईग्रस्त असल्याने सात टॅंकर सुरू आहेत.

रायगड, पालघरला झळ
रायगड - जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडूनही अतिउपशामुळे भूगर्भातील पातळी खालावली. 75 गावे आणि 300 वाड्या टंचाईच्या उंबरठ्यावर पोचल्यात. खारेपाट भागात जमिनीखालील पाणीही खारे असल्याने टॅंकरद्वारे पुरवठा करावा लागतो. पालघर जिल्ह्यात सरासरी 2500 मिलिमीटर पाऊस पडला. सूर्या, वांद्री धरणांसह इतर धरणांत पुरेसा साठा आहे. 20 गावे आणि 44 पाड्यांवर सध्या 21 टॅंकर धावताहेत.

लातूरला यंदा दिलासा
लातूर - शहर 2016 मध्ये देशाच्या नकाशावर झळकले ते रेल्वेने पाणी पुरविल्याने! 35 वर्षांत मांजरा धरण प्रथमच कोरडे पडले. 20 एप्रिल 2016 पासून जलदूत रेल्वेद्वारे मिरज येथून 105 फेऱ्यांद्वारे एकूण 25 कोटी 45 लाख लिटर पाणी आणावे लागले. यंदा मांजरा धरणात 158 दशलक्षघनमीटर साठा असून, पुढील वर्षापर्यंत पुरवठा होऊ शकतो.

वापरापेक्षा अधिक बाष्पीभवन
पैठणच्या नाथसागरात सध्या 39 टक्के पाणी आहे. औरंगाबाद, जालना, नेवासा (ता. नगर) यांसह 256 गावे; तसेच औद्योगिक वसाहतींना पाणी पुरविले जाते. गेल्या वर्षी धरणात तीन टक्के साठा राहिल्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. यंदा हे संकट टळले आहे. नाथसागरातून नागरी व औद्योगिक वसाहतींना दररोज मिळून 0.3 दशलक्ष घनमीटर पाणी पुरविले जाते; तर 1.7 दशलक्ष घनमीटरचे बाष्पीभवन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com