यूपीच्या निवडणुकीत नोटांचा उपयोग धर्माचा दुरुपयोग - वृंदा करात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

औरंगाबाद - उत्तरप्रदेशात नोटांचा भरपूर उपयोग आणि धर्माचा दुरुपयोग करून भाजपने विजय मिळवला. उमेदवाराने किती पैसे खर्च करावे, याला मर्यादा असल्या तरी पक्षाने किती खर्च करावा, याला मात्र मर्यादा घातल्या नाहीत. मागील निवडणुकीपेक्षा यावेळेस चौपट काळ्या पैशांचा वापर झाला. यूपीच्या विजयाबरोबर गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपला राज्यपाल आणि नोटा दोन्ही कामी आल्याची टीका मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी केली.

औरंगाबाद शहरात कार्यक्रमाकरिता आल्या असता, त्यांनी बुधवार (ता.15) माध्यमांशी संवाद साधला. वृंदा करात म्हणाल्या की, पाच राज्यांत पैशांचा जास्त उपयोग झाला. भारतीय जनता पक्षाने पाण्यासारखा पैसा खर्च करत झेंडे, बॅनर, टीव्ही, वर्तमान पत्रांत जाहिराती दिल्या. 2012 च्या तुलनेत 2017 च्या निवडणुकीत चौपट काळ्या पैशांचा वापर झाला आहे. मागील दोन वर्षांपासून उत्तरप्रदेशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडवून आणल्या. पंतप्रधानांसारख्या जबाबदार व्यक्तींनी जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्‍तव्य केले. पंतप्रधान आपल्या पदाची उंची विसरून, असे वक्‍तव्य त्यांनी केले. यामध्ये भाजप जिंकला असला तरी खरा प्रश्‍न भारत जिंकला का हा आहे.

गर्व्हनर हाऊस हाऊस झाले पार्टी कार्यालय
भाजपला गोवा आणि मणिपूर मध्ये वोट कामी आले नाही, मात्र त्यांना गर्व्हनर आणि नोट हे दोन्ही चांगलेच कामी आले. गर्व्हनर हाऊसलाच पार्टी कार्यालय करून टाकले जात आहे. हे देशासाठी दुर्दैवी बाब आहे. या सर्वांमध्ये कॉंग्रेस काहीच करू शकली नाही ते आपापसांतच भांडत राहिले.

ईव्हीएम बंदीऐवजी पेपर ट्रोल द्यावा
सध्या ईव्हीएम बंदीची मागणी होत आहे. मात्र बंदीची गरज वाटत नाही. यामध्ये पेपर ट्रोल देण्याची सुविधा आहे, ते ट्रोल प्रत्येकाला दिले गेले पाहिजे. देशातील लोकशाही ही भांडवलदारांच्या हातात जात आहे. 82 टक्के खासदार सध्या कोट्यधीश आहे. 20 टक्के खासदार थेट उद्योगपती आहे. सर्वसामान्यांनी मतदान करणे आणि कोट्यधीशांनी राज्य करणे हे असेच चित्र सध्या झाले आहे. कारण निवडणूक ही सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात राहिलेली नाही.

बोलणारे ठरताहेत देशद्रोही, नक्षलवादी अन्‌ डावे
सध्या सरकारच्या विरोधात बोलतो त्याला एकतर देशद्रोही, डाव किंवा नक्षलवादी ठरविले जात आहे. तुम्ही दंडुक्‍याची भीती दाखवून कोणाची जीभ बंद करू शकता मात्र त्याचे "दिल, दिमाग, विचार' यांना थांबवू शकत नाही. जेव्हा सरकार ऐकणार नाही तेव्हा रस्त्यावर उतरण्याशिवाय आमच्याकडे शिल्लक राहते काय. येत्या काळात सर्व डावे पक्ष आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढणार आहोत. आमची डोके कलम करणारी संस्कृती नसून मने जोडणारी संस्कृती आहे.