नांदेड, जालन्यात वीज पडून सात महिला मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

मुदखेड/जालना - शेतात काम करीत असताना सोमवारी वीज पडून दोन घटनांत एकूण सात महिला मृत्युमुखी पडल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील कारवा (ता. उमरी) येथे कचरा वेचणीसाठी गेलेल्या पाच महिलांचा आज दुपारी वीज पडून जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत जालना जिल्ह्यातील खडकावाडी (ता. घनसावंगी) येथील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

कारवा येथे दुपारी साडेचारच्या दरम्यान पाऊस सुरू झाल्याने महिला झाडाखाली थांबल्या होत्या. त्या झाडावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेतकरी संभाजी भुताळे यांच्या शेतात त्या तणकट व इतर कचरा वेचणीसाठी गेल्या होत्या.

दरम्यान, खडकावाडी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील समीना इक्‍बाल शेख (वय 49) व सीमा इक्‍बाल शेख (20) या मायलेकी शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर आज दुपारी अडीचच्या सुमारास वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.