पत्नीच्या डोक्‍यात मुसळी घालून खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

चारित्र्याच्या संशयाने घेतला जीव, नारेगावच्या चमचमनगरातील प्रकार, झोपेत असताना पतीचे कृत्य
औरंगाबाद - चारित्र्यावर संशय घेऊन एका व्यक्‍तीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यात मुसळी घालून खून केला. ही घटना सोमवारी (ता. एक) पहाटे तीनच्या सुमारास घडली. मुमताज मोहन तामचीकर (वय 42, रा. चमचमनगर, नारेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी माहिती दिली, की मुमताज हिचा पती मोहन ऊर्फ बिच्चू गुड्डू तामचीकर (वय 50) हा अनेकदा रात्री दारू पिऊन आल्यानंतर चारित्र्याच्या संशयातून सतत तिला मारहाण करीत होता. रविवारी (ता. 30) सायंकाळी रात्री तो घरी आला. त्या वेळी घरी त्याचा मुलगा करण व पत्नी मुमताज होती. मोहनने चारित्र्यावर संशयावरून वाद घालत तिला मारहाण सुरू केली. दरम्यान, मुलगा करणने मध्यस्थी करीत वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

पण, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. दरम्यान, वाद वाढत असल्याने करणने वडील मोहनला मारहाण केली आणि शांत बसण्याची सूचना केली. एवढ्यावर प्रकरण शांत झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले; परंतु, मोहनच्या मनात प्रचंड राग होता. मुलाने पत्नीसमोर मारहाण केल्याने तो अस्वस्थ झाला. त्याची खदखद बाहेर आली. पहाटे तीनला तो उठला व पत्नी मुमताजजवळ येऊन त्याने तिच्या डोक्‍यात मुसळी घातली व तो पसार झाला. जोरदार प्रहार बसल्याने तिचा मृत्यू झाला. ही बाब करणला समजताच त्याने लगेचच एमआयडीसी सिडको पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मुमताजला घाटीत नेले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, खुनाच्या प्रकरणात करणने तक्रार दिली. त्यानुसार, मोहनविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल जाधव करीत आहेत.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी
मोहन तामचीकर हा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा 2012 मध्ये एका वृद्धाचा खून केल्याचा आरोप आहे. याशिवाय त्याच्या विरुद्ध अन्य काही गुन्हे असून, तो सध्या पसार झाला आहे.