चार शिक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

प्रा. अविनाश अवताडे मृत्यूप्रकरण, अन्य एकाचाही समावेश

प्रा. अविनाश अवताडे मृत्यूप्रकरण, अन्य एकाचाही समावेश
उस्मानाबाद - प्रा. अविनाश अभिमान अवताडे मृत्यूप्रकरणी भूम येथील प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी चार शिक्षकांसह अन्य एकावर कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. येथील दिशा करिअर ऍकॅडमीचे संचालक प्रा. अविनाश अवताडे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी त्यांच्या पत्नी सुवर्णा यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून भूमच्या प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.

प्रा. अविनाश अवताडे त्यांच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी लावून धरली होती; परंतु पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. शिवाय प्रा. अवताडे यांच्या पत्नीचीही फिर्याद दाखल केली नाही.

प्रा. अवताडे हे उत्कृष्ट जलतरणपटू होते, तरीही साध्या बंधाऱ्यात त्यांचा बुडून मृत्यू कसा झाला, अशी शंका त्यांच्या पत्नीने व्यक्त केली. शिवाय त्यांच्या अंगावरील जखमांमुळेही त्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या. या सर्व बाबी सांगूनही वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पत्नी सुवर्णा अवताडे यानी ऍड. प्रशांत कस्तुरे यांच्यामार्फत भूम येथील प्रथमवर्ग न्यायालयात चार शिक्षकांसह अन्य एकावर त्यांच्या पतीचा कट रचून खून केल्याच्या कलमाखाली फिर्याद दाखल केली. या प्रकरणात न्यायालयाने यशश्री क्‍लासेसचे शिक्षक रविकांत शितोळे, अमोल निंबाळकर, ज्ञानोदय क्‍लासेसचे वैजिनाथ खोसे, चैत्राली क्‍लासेसचे गोविंद चव्हाण व जयाजी वाकुरे यांच्यावर वाशी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ऍड. प्रशांत कस्तुरे यांना ऍड. कुणाल व्हटकर, ऍड. बी. व्ही. शिंदे, ऍड. एस. एस. शेख यांनी सहकार्य केले.

काय आहे प्रकरण?
13 नोव्हेंबर 2016 ला रविवारी उस्मानाबाद येथील खासगी क्‍लासेस घेणाऱ्या 20 शिक्षकांनी सोन्नेवाडी (ता. भूम) येथील शिवारात जेवणाचे आयोजन केले होते. त्या वेळी सर्वजण जेवण करून जवळच असलेल्या बंधाऱ्यात पोहायला गेले होते. दरम्यान प्रा. अविनाश अवताडे हे अचानक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले.