चव्हाण यांचे भाषण निरीक्षकाला भोवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नांदेड - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पोलिसांच्या वाहनावरील ध्वनिक्षेपकाचा वापर करून राज्य, केंद्र सरकारवरच टीका केल्याच्या प्रकाराचे पडसाद पोलिस दलात उमटले आहेत. या प्रकाराला जबाबदार धरून भोकर येथील पोलिस निरीक्षक संदीपान शेळके यांची नांदेडच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शेळके हे मंगळवारी (ता. 1) नांदेडला उपस्थिती लावून रजेवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

किनी (ता. भोकर) येथे पीकविमा भरण्यासाठी रांगेत उभे असलेल्या शेतकरी रामा पोतरे (दिवशी बु, ता. भोकर) यांचा शनिवारी (ता. 30) हृदयविकाराने मृत्यू झाला. चव्हाण हे रविवारी (ता. 31) पोतरे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी गेले होते. तेथून ते भोकरला आले. पीकविमा भरण्यासाठी तेथील स्टेट बॅंकेसमोर त्यांना शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसली. शेतकरी, बॅंक अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याच्या हेतूने चव्हाण यांनी तेथे थांबून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस वाहनावरील ध्वनिक्षेपकाचा वापर करून पीकविम्यावरून केंद्र, राज्य सरकारवर टीका करणारे भाषण केले. सरकारी यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षाच्या बड्या नेत्याने सरकारवरच टीका केल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. यावरून वादंग निर्माण होण्याची शक्‍यता दिसताच पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी भोकरचे पोलिस निरीक्षक शेळके यांची तातडीने बदली केली.