आता शाळा सुटेल, पण पाटी फुटणार नाही; 'खापराची' पाटी होतेय गायब

शिवचरण वावळे
शुक्रवार, 7 जुलै 2017

‘मॅजिक स्लेट’ डिजिटल पाटीला सर्वाधिक मागणी
 

नांदेड : शाळेत जाणाऱ्या प्रत्येक लहान मुलाच्या शिक्षणाचा ‘श्री’गणेशा दगडी पाटीपासून होत असे. त्यामुळे अपसूकच शाळा सुटण्यावर ‘शाळा सुटली पाटी फुटली' असं गाणं विद्यार्थ्यांना शाळेच्या दरवाजाकडे पाहत गुणगुणत असत. परंतु, काळाच्या ओघात ही काळी खापराची पाटी गायब होऊन तिची जागा पत्रा, कार्डबोर्डची पाटी किंवा मॅजिक स्लेटने घेतली असल्याचे दिसून येते. यामुळे हल्लीच्या शाळेतील लहान मुलांना दगडी पाटी कायतेच माहिती नाही.

शिक्षणाची सुरवात करावयाची म्हणजे दगडी पाटीवर लेखनीने श्रीगणेशा लिहायाचे, त्यावर गिरवायचे. पाटीवर सरस्वती रेखाटून त्या पाटीची पूजा विजयादशमीदिवशी केली जात असे. किमान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या दफ्तरामध्ये पाटी, लेखणी किंवा खडू असायचाच. त्याबरोबर लिहिलेले पुसण्यासाठी डस्टर अथवा सुती कापड असायचे. घरी पाटीवर लिहलेला गृहपाठ दुसऱ्या दिवशी शिक्षकांना दाखवण्यापूर्वीच पुसला जात असे. लिहलेला गृहपाठ पुसला जाऊनये म्हणून याची काळजी घेत जपून न्यावी लागत असे. परंतु काळाच्या ओघात हे सर्व संपले आहे. खापराची तथा दगडी पाटी एखाद्याच विद्यार्थ्याच्या दफ्तरामध्ये पाहावयास मिळणेदेखील दुरापास्त झाले आहे.

या दगडी पाटीची जागा जाड पुठ्ठा किंवा कार्डबोर्डच्या पाटीने घेतली. त्या वेळी पत्र्याची पाटीही बाजारात आली. परंतु पत्र्याच्या पाटीला पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी फार प्रतिसाद दिला नाही. त्याचबरोबर मणी असलेली आकर्षक पाटीही बाजारात आली. यामध्ये अर्ध्या भागात मणी व अर्ध्या भागात लिहिण्यासाठी पाटी आहे. गणित शिकताना या मण्यांचा चांगला उपयोग करता येत असे. सध्या काही मुले मॅजिक स्लेटचा उपयोग करतात. या मॅजिक स्लेटवर आपण आपल्या हाताच्या बोटानेही लिहू शकतो. त्यावर लिहिलेले पुसण्यासाठी स्पंज अथवा पाण्याची आवश्‍यकता नाही. फक्त लिहिलेला भाग थोडा वरती उचलला की त्यावरील अक्षरे गायब होतात. परंतु ही मॅजिक स्लेट फारशी टिकाऊ नाही. तसेच त्यावर अक्षर फार चांगले येत नसल्याचे काही पालकांचे मत आहे.

सध्या बहुतांश विद्यार्थी तर प्राथमिक शिक्षणापासूनच वह्यांचा वापर करत आहेत. सुरवातीला चाररेघी, दुरेघी नंतर एकरेघी वहीवर शिसपेन्सिलचा वापर करून लिहितात, नंतर पेनचा वापर करतात. ग्रामीण भागात काही ठिकाणी दगडी पाटीचा उपयोग केला जातो; परंतु शहरी भागात मात्र दगडी पाटीचा उपयोग क्वचितच दिसतो. कालपरत्वे दगडी पाटीऐवजी सध्या कार्डबोर्ड, मॅजिक स्लेटचा उपयोग जरी होत असला तरी दगडी पाटीवर लिहिण्याची मजा काही वेगळीच.