नांदेडमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी सात वाहने जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नांदेड - पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीना यांच्या विशेष पथकाने देगलूर परिसरात आज (मंगळवार) दुपारी टाकलेल्या छाप्यात अवैध वाळू वाहतूक करणारे सात ट्रक जप्त केले. पन्नास ब्रास वाळूसह ट्रक असा एकूण एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी वाळू जणांवर देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण बसावे यासाठी पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीना यांनी विशेष पथक स्थापन केले. या पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली. मंगळवारी दुपारी हे पथक देगलूर परिसरात गस्तीवर होते. देगलूर रस्त्यावर त्यांनी सापळा लावला. या वेळी एकामागोमाग सात ट्रक वाळू वाहतूक करणारे ट्रक त्यांनी थांबविले. त्यांच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता परवाना नव्हता. त्याउलट रॉयल्टी पावतीवर तारखेत खाडाखोड केल्याचे आढळून आले. या पथकाने सातही ट्रक देगलूर पोलिस ठाण्यात जमा केले. बनावट पावत्या तयार करून वाळू वाहतूक करणारे मोठे रॅकेट असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरची माहिती देगलूर तहसीलदारांना देण्यात आली.

पथकप्रमुख ओमकांत चिंचोलकर यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक संदीप गिरी, कैलास गिरी, बाबू सनाफ, रवी चव्हाण, अब्दुल रहेमान, शेख सलीम शेख पिरहमद, बजरंग राठोड, एम. डी. मिनाज, बबलू शेठ, ट्रकमालक जगदीश बिरादार, शेख ईब्राहीम, सलमान खान आणि नृसींह कुलकर्णी यांच्याविरुद्ध देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही सर्व चालक व मालकांची टोळी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील आहे. ही कारवाई पथकप्रमुख श्री. चिंचोलकर यांच्यासह राहुल लाठकर, उद्धव खंदारे, अप्पासहेब जगताप, साईनाथ निरणे, सतीश कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर आवातीरक, पराज लाठकर, गजानन पायनापल्ल यांनी केली.