बहिणीला न नांदवणाऱ्या दाजीचा मेहुण्याकडून खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नांदेड - लग्नानंतर बहिणीला चांगले नांदवले नाही म्हणून मेहुण्याने दाजीवर तलवारीने हल्ला केला. यात दाजीचा मृत्यू झाला. कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात मंगळवारी (ता. 26) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा थरार घडला. घटनास्थळी मृताच्या हाताचा तुकडा पडला होता. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः येथील विक्रमजितसिंग बलजितसिंग लिखारी याच्या बहिणीचा विवाह औरंगाबाद येथील हरबलासिंग दारकसिंग शिलेदार (वय 30) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांनी काही दिवस बहिणीला चांगले नांदवले; परंतु नंतरच्या काळात तिला त्रास द्यायला सुरवात केली. अखेर हे प्रकरण पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण 2013 मध्ये कौटुंबिक न्यायालयात दाखल करण्यात आले. दिलेल्या तारखेला हरबलासिंग शिलेदार हजर राहत नसे. आज तडजोड प्रकरणी घटस्फोट होणार होता. त्या बदल्यात काही रक्कम विवाहितेला द्यायची होती, असे पोलिसांनी सांगितले; परंतु संतप्त झालेल्या पीडितेच्या भावाने म्हणजेच विक्रमजितसिंग लिखारी याने दाजी हरबलासिंगवर तलवारीने हल्ला केला. यात हरबलासिंग याचा एक हात शरीरावेगळा झाला. हल्ल्यानंतर लिखारी पसार झाला. तलवारीच्या तीन वारांमुळे हरबलासिंग गंभीर जखमी झाला. पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान हरबलासिंग शिलेदार याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Web Title: nanded news murder crime