नांदेड महापालिकेच्या सभेत गदारोळ; शिवसैनिकांनी पळवला राजदंड

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 26 मे 2017

प्रचंड गोंधळात पुरवणीसह २१ ठराव मंजूर

महापौर शैलजा स्वामी यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना एकेरी भाषेचा वापर करत दम दिल्याने या संतप्त नगरसेवकांनी राजदंड पळविला. अतिशय गोंधळात पुरवणीसह २१ महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.

नांदेड : नवीन कौठा व नगरेश्‍वर मंदीर येथील अतिक्रमित झालेल्या विस्थापित लोकांना अजून घरे का दिले नाहीत. तसेच नगरेश्‍वर मंदिराचा विषय इतिवृत्तात का घेतला नाही यावरून शिवसेना भाजपाच्या नगरसेवकांनी प्रचंड गदारोळ सुरू केला. यावेळी महापौर शैलजा स्वामी यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना एकेरी भाषेचा वापर करत दम दिल्याने या संतप्त नगरसेवकांनी राजदंड पळविला. अतिशय गोंधळात पुरवणीसह २१ महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेची सर्व साधारण सभा शुक्रवारी (ता. २६) दुपारी तीन वाजता महापौर शैलजा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. यावेळी उपमहापौर शफी कुरेश व आयुक्त समीर उन्हाळे यांची उपस्थिती होती. सभा सुरू होताच शिवसेनेचे विरोधी पक्षनेते प्रमोद उर्फ बंडू खेडकर हे बोलण्यासाठी उभे टाकले. यावेळी काॅंग्रसचे अॅड. विश्‍वजीत कदम यांनी आपले बोलणे सुरू केले.

यावेळी महापौर व कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधी पक्ष नेत्याचा आवाज बंद केला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक विनय गुर्रम, बाळासाहेब देशमुख, अशोक उमरेकर, बालाजी कल्याणकर, तुलजेश यादव, सुदर्शना खोमणे, नागाबाई कोकाटे यांनी महापौर यांना जाब विचारला. अभिषक सौदे यांनी व प्रमोद खेडकर यांनी नगरेश्‍वर मंदीर आणि कौठा भागातील काढलेले अतिक्रमण या विषयावर सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार, सभागृह नेता विरेंद्रसिंग गाडीवाले, उमेश चव्हाण, विनय गिरडे पाटील यांच्यासह एमआयआमचे शेरअली व आदी नगरसेवकांनी चांगलाच गोंधळ घातला.

या गोंधळातच शिवसेनेच्या नगरसेवकांनी डायसवरील राजदंड पळविला. यावेळी महापौर यांनी सभा काही वेळेपूरती तहकुब केली. काही वेळाने परत सभा सुरू झाली. यावेळी इतीवृत्तावर असलेले मुख्य सात ठराव पुरवणी पत्रीकेवरील १४ ठराव गोंधळातच मंजूर केले. महत्वाच्या विषयावर चर्चा झालीच नाही. तसेच नगरसेवक विनय गुर्रम यांना निलंबीत केले. पावसाळापूर्वी महापालिकेने शहरात कोणती कामे करायची, स्वच्छतेविषयी, आरोग्यविषयी या महत्वाच्या विषयाला बाजूलाच ठेवले. सभागृहात विचारलेल्या सर्वच प्रश्नांना महापालिकेचे आयुक्त व महापौर यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. महापौर शैलजा स्वामी यांचे सभेवरील सर्व नियंत्रण सुटले होते. त्यांच्याच पक्षाच्या नगरसवेकांनी त्यांना विरोध करत चांगलेच धारेवर धरले.