‘ऑरिक’ आता एका क्‍लिकवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

औरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या कारभाराला स्मार्ट करण्यासाठी ‘एआयटीएल’ने एक पाऊल पुढे टाकत आपले हरहुन्नरी ॲप लाँच केले. रोजगाराच्या संधी, प्लॉटधारकांनी केलेल्या अर्जांची सद्यःस्थिती आणि आलेल्या तक्रारींचा निवाडा करण्यासाठी हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

औरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या कारभाराला स्मार्ट करण्यासाठी ‘एआयटीएल’ने एक पाऊल पुढे टाकत आपले हरहुन्नरी ॲप लाँच केले. रोजगाराच्या संधी, प्लॉटधारकांनी केलेल्या अर्जांची सद्यःस्थिती आणि आलेल्या तक्रारींचा निवाडा करण्यासाठी हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

‘ऑरिक’मध्ये काम करणाऱ्या आणि राहणाऱ्यांच्या दिमतीला औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी प्रशासनाने एक विशेष ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून ऑरिक प्रशासनाशी केले जाणारे सगळे व्यवहार ऑनलाइन होणार असून, आपल्या कामांची सद्यःस्थिती या माध्यमातून पाहता येणार आहे. नऊ आयकॉन असलेल्या या ॲपमध्ये ऑरिकच्या संकेतस्थळांशी थेट जोडणी असून, यात औद्योगिक शहरातील हालचाली, होणारे बदल, नव्या कामांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. ‘लॅण्ड इन्फॉर्मेशन’ सिस्टीम आयकॉन अंतर्गत प्लॉटचे पेमेंट, घेतलेल्या जागेची सद्यःस्थिती, कागदपत्रांची माहिती आणि परवानग्यांची माहिती प्राप्त होणार आहे. ‘बिल पेमेंट’अंतर्गत वीजबिल, पाण्याच्या वापराच्या बिलांचा भरणा करता येणार आहे. बिल पेमेंट करण्यासाठी सदस्य नसलेल्यांना गेस्ट म्हणूनही पेमेंट करता येईल. ‘कम्प्लेंट’आयकॉनच्या साहाय्याने एका क्‍लिकवर तक्रारीची सद्यःस्थिती, नवी तक्रार करणे, तिचा निपटारा हे विषय तपासता येणार आहेत. याशिवाय यातून बातम्या, कॅलेंडर आणि पर्यावरणाची माहिती देण्यात येणार आहे. 

‘एम्प्लॉयमेंट’मधून शोधा नोकरी 
‘एम्प्लॉयमेंट’ आयकॉनच्या साहाय्याने शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतीत असलेल्या नोकऱ्यांच्या संधी सर्वांसमोर देणार आहेत. यातून गरजूंना नोकरीचा शोध घेता येईल; तर नोकरी देणाऱ्या कंपन्यांना आपली गरज या ॲपच्या माध्यमातून गरजवंतांना सांगता येणार आहे. या माध्यमातून आपला बायोडाटा पोस्ट करता येईल. या बायोडाटांची छाननी करून कंपन्या आपल्या गरजेच्या उमेदवारांचा शोध घेऊ शकणार आहेत. 

ॲपचे लाँचिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यातून लोकांना गतिमान आणि सोपे प्रशासन देता येणार आहे. ऑरिक हॉलमध्ये उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीतून या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. 
- गजानन पाटील,  सरव्यवस्थापक, एआयटीएल.

Web Title: ORIC is now one click