ऑनलाइन बंदोबस्तामुळे पोलिस तणावमुक्‍त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

उस्मानाबाद - तुळजापूरनगरीत सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. दररोज हजारो भाविक शहरात दाखल होत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत आहे. मंदिर संस्थानसह प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, पोलिस विभागाने आधुनिकतेची कास धरून प्रथमच ऑनलाइन बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाला असून, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्हीचा चांगला उपयोग होत आहे. पोलिसांचे ड्यूटी वाटप ऑनलाइन केल्याने त्याचाही चांगला परिणाम सध्या दिसत आहे.

उस्मानाबाद - तुळजापूरनगरीत सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. दररोज हजारो भाविक शहरात दाखल होत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत आहे. मंदिर संस्थानसह प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, पोलिस विभागाने आधुनिकतेची कास धरून प्रथमच ऑनलाइन बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाला असून, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्हीचा चांगला उपयोग होत आहे. पोलिसांचे ड्यूटी वाटप ऑनलाइन केल्याने त्याचाही चांगला परिणाम सध्या दिसत आहे. यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने दर दोन तासाला दिलेल्या पॉईंटला संबंधित कर्मचारी आहे का नाही याची खातरजमा होत असल्याने बंदोबस्त अधिकच काटेकोर झाल्याचे चित्र आहे. 

तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी होते. या वेळी पोलिसांची कुमकही वाढवावी लागते, तरीही गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणेला त्रास होतो; पण यंदा शहरात तब्बल ११५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळविणे पोलिसांना सोपे झाले आहे. अनेकवेळा पोलिसांच्या अनुपस्थितीचाही फटका बंदोबस्तामध्ये बसतो. ड्यूटीसाठी दिलेल्या जागेवर पोलिस असेलच याची खात्री देता येत नाही; पण या वेळी पोलिस दलाने यावरही चांगलाच तोडगा काढला आहे. ऑनलाइन बंदोबस्तामुळे ड्यूटीवर असलेल्या पोलिसांच्या मोबाईलवर आपल्या पॉईंटचे नाव येते. त्या ठिकाणी कर्तव्यावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणारी विशिष्ट यंत्रणाही उभारली आहे. त्यामुळे दांडी मारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर विभागाचे नियंत्रण आहे.

आवश्‍यकतेनुसार पोलिसांची संख्या राहिल्याने आता गर्दीचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे दिसत आहे. पोलिसांची नियमित हजेरी व अत्यंत काटेकोर बंदोबस्तामुळे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष होणाऱ्या अनेक वाईट प्रवृत्तींना आळा या पद्धतीमुळे बसला आहे. दुसऱ्या बाजूला सीसीटीव्हीची यंत्रणा उत्तम दर्जाची असून त्यानुसार अगदी छोट्या-छोट्या बाबी यात टिपल्या जात आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची चांगली सोय झाली आहे. नियंत्रण कक्ष तुळजापूरच्या पोलिस संकुल येथे उभारण्यात आले आहे. गर्दीवर सीसीटीव्हीचे, तर पोलिसांवर वरिष्ठाचे नियंत्रण राहिल्याने सगळ्यांना मोकळा श्वास घेता येत असल्याची भावना सध्या व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या दृष्टीने आवश्‍यक अशा सर्व गोष्टींची दक्षता घेतली असून कुठेही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी प्रशासन घेत असल्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, तुळजापुरात दररोज तासाभरात किमान तीन हजार भाविक दर्शन घेत असून, ऑनलाइन बंदोबस्तामुळे संपूर्ण शहरावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

Web Title: osmanabad news police